‘कंपोस्ट खड्‌डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

१ मे पासून राज्यस्तरीय अभियान

मुंबई, दि.२२ : संपूर्ण स्वच्छता करण्याबरोबरच ग्रामीण भागातील सर्व गावांना दृष्यमान स्वच्छतेचा अपेक्षित दर्जा मिळवून ग्रामीण जनतेत स्वच्छतेविषयक वर्तणुकीत बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने राज्यात १ मे पासून “कंपोस्ट खड्‌डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू” अभियान राबविण्यात येणार असून या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

मंत्रालयातील दालनात पाणीपुरवठा, जल जीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान या विषयी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनचे संचालक ई. रविंद्रन यांच्यासह मंत्रालयीन वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन करून वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच शाश्वत सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजावून देण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा व पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी, कचरा कमी करणे, पुनर्वापर करणे आदी उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.दि. ०१ मे ते दि.३० सप्टेंबर २०२५ पर्यंत  एकूण १३८ दिवस अभियान अंमलबजवणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागात मे महिन्यातील पाणीटंचाईसंदर्भात नियोजन करण्याचे आदेश देताना ते म्हणाले टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक प्रभावी करण्यासाठी सक्षम नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

जल जीवन मिशनमध्ये समाधानकारक काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना  नोटीस पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक शौचालयांच्या कामांबाबत अधिक गंभीरतेने प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला आहे. या कामांसाठी आवश्यक जागा मिळविण्यासाठी स्थानिक पातळीवर समन्वय साधण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जलमित्र प्रशिक्षण

ग्रामस्तरावर जलसाक्षरता वाढविण्यासाठी ‘जलमित्र’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असून गावातील नागरिकांमध्ये जलसंवर्धनाबाबत जागृती निर्माण होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीत विभागाच्या विविध योजनांची प्रगती तपासण्यात आली.

स्वच्छ भारत मिशनच्या ग्रामीण भागातील अंमलबजावणीचा आढावा घेताना घनकचरा व्यवस्थापन, हागणदारीमुक्त अधिक मॉडेल गाव निर्माण करणे, सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

००००

राजू धोत्रे/विसंअ