मुंबई दि. 22 : एकेकाळी भारत विकसनशील देश म्हणून ओळखला जात होता, मात्र आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने घोडदौड करत आहे. या प्रगतीला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ‘एकात्म मानव दर्शन’ तत्वज्ञानाचा आधार असल्याचे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी केले. माटुंगा येथील रुईया महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘एकात्म मानवदर्शन’ हीरक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
राज्यपाल आर. एन. रवी म्हणाले, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या ‘एकात्म मानव दर्शन’ तत्वज्ञानात समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करण्यात आला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील या तत्वानुसार राज्यकारभार सुरू आहे. अंत्योदय अर्थात शेवटच्या माणसापर्यंत विकासाची गंगा पोहोचवली जात आहे. त्यामुळेच भारताचा विकसनशील देश ते विकसित राष्ट्र पर्यंत प्रवास झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ईशान्य भारतातील परिस्थिती बदलली असून तिथे शांतता निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. अंत्योदयाचा मार्ग अवलंबून त्यांनी ईशान्य भारतात पायाभूत सुविधा निर्माण करून खऱ्या अर्थाने भारताला जोडण्याचे काम केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांच्या प्रमुख उपस्थितीत पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘एकात्म मानवदर्शन’ हीरक महोत्सवाला सुरुवात झाली. रिजिजू यावेळी म्हणाले की, याच रुईया महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी साठ वर्षापूर्वी ‘एकात्म मानव दर्शन’ तत्वज्ञान जनतेपुढे मांडले. या ऐतिहासिक वास्तूत पुन्हा पंडितजींच्या विचारांना आत्मसात करताना मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. पंडितजींचे विचार भारताला शक्तिशाली राष्ट्र म्हणून जगात ओळख देत असल्याचे केंद्रीय मंत्री श्री. रिजिजू यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या पंडित दीनदयाळ ‘एकात्म मानवदर्शन’ हीरक महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारात राष्ट्रप्रेमासह संपूर्ण विश्वातील मानवाच्या सर्वागीण विकासाचे मर्म जपले गेले आहे. त्यांच्या विचारांचा खजिना जनतेसमोर उघडताना अत्यानंद होत आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी ऐतिहासिक सोहळा आयोजित केल्याबद्दल कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे कौतुक केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या तपस्येतून देशाला दिशा देणारे विचार मिळाले असून सर्वांनी त्याचा अंगिकार केला पाहिजे.
पंडितजींच्या एकात्म मानव दर्शनाच्या हीरक महोत्सवानिमित्त भारतीय टपाल खात्याने विशेष टपाल कव्हर तयार केले असून राज्यपाल रवी यांच्या हस्ते यावेळी त्याचे प्रकाशन करण्यात आले.
एकात्म मानव दर्शन या हीरक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात पंडित दीनदयाळ उपाध्याय संशोधन संस्थेचे अध्यक्ष अतुल जैन, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष एस.के जैन, पोस्ट मास्तर जनरल अमिताभ सिंग तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
हा सोहळा पुढील तीन दिवस रुईया महाविद्यालयात सुरू राहणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल, डॉ.कृष्ण गोपालजी, सुनीलजी अंबेकर, डॉ.मनमोहनजी वैद्य तसेच सुरेशजी सोनी आणि एल.संतोषजी यांचा या व्याख्यानमालेतील वक्त्यांमध्ये समावेश आहे.
****
संध्या गरवारे/विसंअ/