मुंबई, दि. 23 : अंबरनाथकरांना शाश्वत व स्वच्छ पाणी पुरवठा देण्यासाठी तसेच पाणी पुरवठा सुधारण्यासाठी योजना तयार असून, त्याच्या अंमलबजावणीला गती देवून सर्वांना सारख्या प्रमाणात पाणी उपलब्ध होईल असे नियोजन करावे, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.
मंत्रालयातील दालनात अंबरनाथ येथील पाणीपुरवठाविषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, चंद्रकांत पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, जल जीवन मिशन चे संचालक इ.रविंद्रन,सह सचिव बी.जी.पवार यांच्यासह अंबरनाथ येथील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले, प्रकल्पाला वनजमिनीच्या वापरासंदर्भातील मंजुरी तसेच ‘एमआयडीसी’मुळे येणार अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करावे. अंबरनाथ शहरातील पाणीपुरवठ्याच्या दीर्घकालीन उपाययोजनेसाठी केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने दोन स्वतंत्र योजना आखण्यात आल्या आहेत.
राज्य शासनाच्या नगरोत्थान महाभियानांतर्गत मंजूर झालेल्या चिखलोली धरणाच्या उंचीमध्ये २.५ मीटर वाढ करून जलसाठा दुप्पट करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे प्रतिदिन १२ दशलक्ष लिटर पाणी मिळण्याची असल्याचे मंत्री श्री पाटील यांनी सांगितले.
२०५६ पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करून आखलेली उल्हास नदीवर आधारित स्वतंत्र पाणी योजना केंद्र शासनाच्या अमृत टप्पा-२ अंतर्गत मंजूर करण्यात आली आहे. एकूण रु. २५८.२८ कोटीच्या योजनेसाठी केंद्र शासन, राज्य शासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून हिस्सा देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यामधील जल जीवन अभियानांतर्गत योजना संपूर्ण लोकसंख्येची सध्याची आणि भविष्यातील पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी सुधारित योजना 55 एल पी सी डी प्रदान करण्यासाठी करण्यात आली असून या कामाला प्राधान्य देण्यात यावे. याअंतर्गत येणाऱ्या गावाला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देशही मंत्री श्री पाटील यांनी दिले.
0000
राजू धोत्रे/विसंअ/