केंद्र व राज्य शासनाकडून विविध उपसा सिंचन योजना, जलयुक्त शिवार अभियान, शेततळी आदि विविध कामांसाठी भरघोस निधी मिळाल्याने सांगली जिल्हा दुष्काळमुक्तीकडे वाटचाल करीत आहे. शेतीसाठी पाणी मिळू लागल्याने दरडोई उत्पादनात वाढ होऊन जिल्ह्याची वाटचाल समृध्दीकडे होत आहे. या पार्श्वभूमिवर जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचे औचित्य साधून जिल्ह्यातील उपसा सिंचन प्रकल्पांची माहिती देणारा लेख…
जिल्ह्यात टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ कालवा, कृष्णा कालवा मध्यम प्रकल्प आदिंच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली आणून जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. हे सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांना जीवनदायिनी ठरत असून या माध्यमातून दरडोई उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. त्यामुळे साहजिकच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीही मदत होत आहे.
टेंभू उपसा सिंचन प्रकल्प
टेंभू गावाजवळील बराज वरून मूळ टेंभू उपसा सिंचन योजनेतून विविध टप्प्यांव्दारे 22 अ.घ.फू. पाणी उचलून सातारा, सोलापूर व सांगली या जिल्ह्यातील 7 तालुक्यामधील एकूण 80 हजार 472 हेक्टर क्षेत्रास सिंचन लाभ देणे प्रस्तावित होते. जून 2024 अखेर 80 हजार 472 हेक्टर इतकी सिंचन निर्मिती ( 100 टक्के) झालेली आहे.
टेंभू विस्तारीत उपसा सिंचन प्रकल्पाकरिता 41 हजार 3 हेक्टर सिंचन क्षेत्र व 8.00 अ.घ.फु. वाढीव पाणी वापर नियोजित गृहीत धरून एकूण 1 लाख 21 हजार 475 हेक्टर सिंचन क्षेत्रास लाभ देणे प्रस्तावित होते. त्यानुसार टेंभू उपसा सिंचन विस्तारीत प्रकल्पास 7370.03 कोटी इतक्या रक्कमेच्या तृतीय सुधारित प्रशासकीय अहवालास शासनाने दिनांक 5 जानेवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे.
कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प
कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत ताकारी व म्हैसाळ अशा दोन स्वतंत्र उपसा सिंचन योजना आहेत. ताकारी उपसा सिंचन योजनेचा उद्भव कृष्णा नदीवर ताकारी गावाजवळ असून या योजनेव्दारे एकूण 4 टप्प्यामध्ये 9.34 अ.घ.फू. पाणी उचलून त्याव्दारे सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव, मिरज, पलूस, कडेगाव व वाळवा या तालुक्यातील 27 हजार 430 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देण्याचे नियोजित आहे.
मूळ म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा उद्भव कृष्णा नदीवर म्हैसाळ गावाजवळ असून या योजनेव्दारे एकूण 6 टप्प्यांमध्ये 17.44 अ.घ.फू. पाणी उचलून त्याव्दारे सांगली जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा या तालुक्यातील 81 हजार 697 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देण्याचे प्रस्तावित आहे.
म्हैसाळ टप्प क्र. 3 (बेडग) मधून नवीन स्वतंत्र म्हैसाळ विस्तारीत – जत उपसा सिंचन योजना प्रस्तावित आहे. म्हैसाळ विस्तारीत – जत उपसा सिंचन प्रकल्पाकरिता 26 हजार 500 हेक्टर सिंचन क्षेत्र व 6.00 अ.घ.फू. वाढीव पाणी वापर नियोजित गृहीत धरून एकूण 1 लाख 35 हजार 627 हेक्टर सिंचन क्षेत्रास लाभ देणे प्रस्तावित आहे.
कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना प्रकल्पास 1 लाख 35 हजार 627 हेक्टर सिंचन क्षेत्र व 32.78 अ.घ.फू. पाणी वापर गृहीत धरून 8272.36 कोटी इतक्या रक्कमेस शासन निर्णय दि. 29 डिसेंबर 2022 अन्वये पाचवी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे.
आरफळ कालवा
कण्हेर धरणापासून निघणारा डावा कालवा कृष्णा नदीस जेथे छेदतो तेथून पुढे त्या कालव्यास आरफळ कालवा असे संबोधतात. आरफळ कालवा (सांगली जिल्ह्याकरिता) कण्हेर व तारळी या प्रकल्पातून 3.83 टीएमसी पाणी वापर प्रस्तावित आहे.
कृष्णा कालवा मध्यम प्रकल्प
सातारा जिल्ह्यात कृष्णा नदीवर खोडशी ता. कराड येथे १५२ वर्षांचा ब्रिटिश कालीन वळवणीचा बंधारा असून नदीच्या डाव्या तीरावरून खोडशी बंधाऱ्यापासून ८६.०० कि.मी. लांबीच्या कृष्णा कालव्याव्दारे सातारा जिल्ह्यातील कराड तालुका व सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस व तासगांव या तालुक्यातील एकूण ५० गावे येतात. येरळा नदीवर वसगडे बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येते.
प्रकल्प ० ते ५६ कि.मी. पर्यंत १८६८ साली पूर्ण करण्यात आला असून महाराष्ट्र शासन निर्णय दि. २५ जून १९५६ अन्वये कृष्णा कालव्याच्या विस्तारीकरण व सुधारणा कामास मंजुरी मिळाली त्यानुसार कृष्णा कालव्याचे विस्तारीकरण व सुधारकाम सन १९७६ साली पूर्ण करण्यात आले. यानंतर वसगडे येथील येरळा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा कृष्णा कालव्याचा टेल टँक म्हणून उपयोगात आणण्यासाठी कृष्णा कालवा विस्तारीकरण व त्यावरील वसगडे बंधारा (जिल्हा सांगली) च्या कामास सुधारीत प्रशासकीय मान्यता शासन निर्णय दि. १९ ऑगस्ट १९८८ अन्वये एकूण २४५.९६७ लक्ष रूपये किंमतीस मान्यता देण्यात आली.
(संकलन – श्री. शंकरराव पवार, जिल्हा माहिती कार्यालय, सांगली)