मुंबई, दि. 23 : आदिवासी भागांमध्ये विविध आजार तसेच त्यावरील उपचार पद्धतींबाबत व्यापक जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच आरोग्य सेवा आदिवासी भागांतील शेवटच्या नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी, यासाठी स्थानिक स्तरावर संबंधित विभागाने समन्वयाने जनजागृती करावी, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले.
मंत्रालयात मंत्री डॉ.अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बाल विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आरोग्य विषयक राबविण्यात येणाऱ्या योजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री डॉ.वुईके म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या आयुष्मान भारत’, ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान’, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनांचा लाभ आदिवासी नागरिकांपर्यंत पोहोचवावा. या योजनांचा लाभ आदिवासींना मिळतो की नाही याची खात्री करावी. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ आदिवासी बांधवांना मिळावा यासाठी त्यांच्याकडे आवश्यक मूलभूत कागदपत्रे असणे अत्यावश्यक आहे. या अनुषंगाने, सर्व संबंधित विभागांनी एकत्रितपणे समन्वय साधून यासाठी यंत्रणा तयार करावी.
आदिवासी भागामध्ये काम करणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांना सहाय्य करण्याच्या हेतूने आणि आरोग्य सेवेचा एकंदरीत अभ्यास करण्यासाठी, तसेच आदिवासी भागामध्ये आरोग्य सेवा पुरविण्यात येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी व त्यावर योग्य उपाययोजना सुचविण्यासाठी राज्यस्तरावर समिती स्थापन केली आहे. नंदुरबार, गोंदिया, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नाशिक, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांतील आदिवासी भागांमध्ये या समितीचा अभ्यास होणार आहे. आदिवासी बांधवांच्या आरोग्य स्थितीत सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने ही समिती महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. आदिवासी क्षेत्रातील कुपोषण कमी करण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. आदिवासी भागातील पोषण आहार आणि आरोग्य सेवा सुधारण्यासाठी विविध विभागाने समन्वयाने काम करावे, असेही मंत्री डॉ.वुईके यांनी यावेळी सांगितले.
****
शैलजा पाटील/विसंअ/