‘सीसीआय’ने राज्याच्या समन्वयाने कापूस खरेदीसाठी कार्यवाही करावी – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. 23 : राज्यात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) मार्फत शेतकऱ्यांकडील कापूस हमी भावाने खरेदी करण्यात येतो. ही खरेदी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन करण्यात यावी, तसेच खरेदीची तारीख आणि उद्दिष्ट आधीच जाहीर करून राज्याच्या समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

शेतकऱ्यांना कापूस विक्रीमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत पणनमंत्री रावल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार सर्वश्री अमित देशमुख, संजय बनसोडे, अमित झनक यांच्यासह ‘सीसीआय’चे व्यवस्थापकीय संचालक ललितकुमार गुप्ता, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अप्पासो धुळज यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

RAJU DONGARE Govt Photographer

कापसाच्या मागणीपेक्षा उत्पादन कमी असल्याने कापूस आयात केला जातो. तसेच राज्यात लांब तंतूच्या कापसाचे उत्पादन कमी होते. त्यामुळे लांब तंतूच्या दर्जेदार कापसाच्या उत्पादनासाठी तसेच कापसाचे प्रती एकर उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी सूचना पणन मंत्री रावल यांनी यावेळी दिली.

ज्या तालुक्यांमध्ये कापूस उत्पादन अधिक आहे तेथे खरेदी केंद्र सुरू करावे तसेच जेथे कमी उत्पादन आहे तो तालुका त्याच जिल्ह्यातील जवळच्या केंद्रास जोडावा, अशी अपेक्षा उपस्थित लोकप्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केली. त्यावर असा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल, असे श्री.गुप्ता यांनी सांगितले. ‘सीसीआय’च्या ॲपमध्ये खरेदीबाबतची सविस्तर माहिती दिली जात असल्याचे सांगून पुढील हंगामात 1 ऑक्टोबरपासून कापूस खरेदी सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

 

00000

बी.सी.झंवर/विसंअ/