महाराष्ट्र-अर्जेंटिना यांच्यात व्यापार व सहकार्याच्या अमर्याद संधी – पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र आणि अर्जेंटिना यांच्यात कृषी, पर्यटन, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यासारख्या विविध क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी आहे, असे प्रतिपादन पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

अर्जेंटिनाचे महावाणिज्य दूत डॅनियल क्वेर यांनी मंत्री श्री. रावल यांची भेट घेतली. उप महावाणिज्य दूत मारिया सिल्विना कोस्टा, पणन कार्यकारी संचालक संजय कदम आदी यावेळी उपस्थित होते.

मंत्री जयकुमार रावल यांनी अर्जेंटिनाशी वाढत्या व्यापार आणि सहकार्याच्या संधींबाबत सकारात्मक दृष्टीकोन मांडला. ते म्हणाले की, कृषी उद्योग आणि कृषी विपणन क्षेत्रात दोन्ही देश एकत्रितपणे काम करू शकतात. अर्जेंटिनाची आधुनिक तंत्रज्ञानाची क्षमता आणि महाराष्ट्राची उत्पादनशक्ती एकत्र आल्यास मोठ्या व्यापार संधींचा फायदा होऊ शकतो. नवीकरणीय ऊर्जा, औषधी उद्योग, माहिती तंत्रज्ञान, तसेच सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रांतही दोन्ही बाजूंनी सहकार्य वाढवले जाईल. या सहकार्यामुळे महाराष्ट्रातील उद्योगांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी बाजारपेठ मिळविण्याचा मार्ग खुला होईल.

अर्जेंटिनाच्या प्रसिद्ध फुटबॉल संस्कृतीचा उल्लेख करताना मंत्री रावल म्हणाले, अर्जेंटिना फुटबॉलसाठी प्रसिद्ध आहे. अर्जेंटिनातील उद्योगांना महाराष्ट्र राज्यातही पर्यटन व खेळ क्षेत्रात सहकार्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. अर्जेंटिनासाठी महाराष्ट्रात गुंतवणूक, व्यापार आणि सहकार्याचे दालन उघडे आहे, असे सांगून त्यांनी दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ करण्याचा विश्वास व्यक्त केला.

 

00000

बी.सी.झंवर/विसंअ/