मुंबई, दि. 24 : केंद्र सरकारच्यावतीने जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्राकरिता ‘वेव्हज् 2025 परिषद’ मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होत आहे. या परिषदेचे यजमानपद महाराष्ट्र शासन भूषवत आहेत. दि. 1 ते 4 मे 2025 या कालावधीत होत असलेल्या या परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. मुंबईत होणाऱ्या या परिषदेस विविध देशांचे मंत्री, धोरणकर्ते, उद्योगपती तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
वेव्हज् परिषदेत जगभरातून 100 पेक्षा जास्त देश सहभागी होणार आहेत. या परिषदेच्या माध्यमातून भारतातील क्रिएटिव्ह इकॉनॉमीला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होणार आहे. भारतामध्ये माध्यम आणि मनोरंजन उद्योग वेगाने वाढत असून रोजगारनिर्मितीसाठी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहे. त्याचबरोबर ओटीटी, ॲनिमेशन, गेमिंग, व्हीएफएक्स, चित्रपट, संगीत आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात देश प्रगती करत आहे. या पार्श्वभूमीवर वेव्हज् परिषदेचे आयोजन होत असून या परिषदेत चर्चासत्रे, उद्योगक्षेत्रात गुंतवणूक आणि विविध कार्यक्रम होणार आहे.
या परिषदेच्या पहिल्या दिवशी ‘भारत व महाराष्ट्र पॅव्हिलियन’ आणि वेव्हज प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून काही महत्त्वपूर्ण घोषणा व सामंजस्य करार (MOU) करण्यात येणार आहे. त्याचबरोबर क्रिएटोस्पिअरचे उद्घाटन आणि ‘वेव्हज बझार’, वेव्हज एक्सलेटर इत्यादींचा प्रारंभ होणार आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी जागतिक मीडिया संवाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये संवाद तसेच क्रिएट इन इंडिया चॅलेन्जेसची अंतिम फेरी होणार आहे. या परिषदेच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी विविध चर्चासत्रांबरोबरच प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
000
संजय ओरके/विसंअ