मुंबई, दि. 24 : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात सुत गिरण्यांसह काही उद्योगधंदे आहेत. त्यामुळे शहरात रोजगारासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही अधिक आहे. कामगारांना परवडणाऱ्या किमतीमध्ये हक्काचे घर दिल्यास त्यांची मोठी सोय होणार आहे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपळगांव येथे अत्यल्प उत्पन्न गटाकरीता बांधण्यात आलेली घरे कामगारांना उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
पिंपळगांव (ता. हिंगणघाट जि. वर्धा) येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटाकरीता सदनिका बांधण्यात आलेल्या आहेत. यापैकी विक्री न झालेल्या सदनिकांबाबत मंत्रालयात गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी मुख्य अभियंता शिवकुमार आडे, उपसचिव अजित कवडे, अवर सचिव रवींद्र खेतले आदी उपस्थित होते.
पिंपळगांव येथील सदनिकांची रंगरंगोटी करावी. त्यानंतर सदनिकांची परवडणाऱ्या किमतीला विक्री करावी. कामगारांना घरे देण्यासाठी हिंगणघाट शहरातील उद्योजकांचे सहकार्य घ्यावे. कामगारांना घर खरेदी करण्यासाठी मिळणारे अनुदान, त्यांच्यासाठी असणाऱ्या योजना याबाबत पडताळणी करावी. त्यानुसार कामागरांना घर खरेदी करून देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचनाही राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी दिल्या. बैठकीत पिंपळगांव येथील सदनिकांबाबत राज्यमंत्री डॉ.भोयर यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
००००
निलेश तायडे/विसंअ