पाणीटंचाईप्रश्नी अधिकाऱ्यांनी संवेदनशील राहावे – अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय मंत्री नरहरी झिरवाळ

पेठ तहसील कार्यालयात आढावा बैठक

नाशिक, दि. २५ : पेठ तालुक्यात पाणी टंचाई जाणवणाऱ्या गावातील टंचाई निवारण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशील राहावे. पाणीटंचाईचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिल्या.

पेठ तालुक्यातील पाणी टंचाईबाबत मंत्री श्री. झिरवाळ यांनी आज दुपारी तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे, गटविकास अधिकारी श्री. सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, सरपंच, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले की, पेठ तालुक्यातील काही गावांना एप्रिल, मे या दोन महिन्यांत पाणीटंचाईची जाणवते. टंचाई  निवारणार्थ सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. वीज वितरण कंपनीने पाणीपुरवठा योजनांना तातडीने वीज जोडणी द्यावी. टंचाई काळात पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करू नये. जलजीवन मिशन अंतर्गत साकारण्यात येणाऱ्या पाणी योजनांच्या कामांना गती द्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

गटविकास अधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी सांगितले की, पेठ तालुक्यात सद्यःस्थितीत तीन टँकर सुरू असून तीन गावांचे टँकरसाठी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी पुरेश्या प्रमाणात निधीची उपलब्धता असल्याचे त्यांनी सांगितले.