वेव्हज 2025 : भारताला कलात्मक भविष्याकडे नेणारा प्रकाशस्तंभ

भारतातील मीडिया आणि मनोरंजन क्षेत्र आज केवळ देशाच्या सांस्कृतिक प्रभावाचा एक भाग नाही, तर जागतिक स्तरावर प्रभाव टाकणारी एक शक्ती बनण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेली WAVES 2025 (World Audio Visual & Entertainment Summit) ही परिषद अत्यंत महत्त्वाची ठरते. 1 ते 4 मे 2025 दरम्यान जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे होणाऱ्या या परिषदेमुळे भारताची सर्जनशील क्षमता, तंत्रज्ञानातील प्रगती, आणि सांस्कृतिक समृद्धी यांचा संगम येथे एका जागतिक व्यासपीठावर सादर केला जाणार आहे.

वेव्हज 2025 ही केवळ एक परिषद नसून, ती भारताच्या ‘क्रिएट इन इंडिया’ अर्थात भारतात निर्माण करा या नवदृष्टीकोनाचा केंद्रबिंदू आहे. भारतातील कला, साहित्य, संगीत, चित्रपट, अ‍ॅनिमेशन, गेमिंग, वेबटून्स आणि अ‍ॅनिमे या सर्व क्षेत्रांतून निर्माण होणाऱ्या आशयाचे जागतिकीकरण करण्याचा प्रयत्न या परिषदेच्या माध्यमातून केला जात आहे. यामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे भारताला एका जागतिक कंटेंट हबमध्ये रूपांतरित करणे, जिथे केवळ सर्जनशीलता नाही, तर आधुनिक तंत्रज्ञान, व्यावसायिक क्षमता, आणि जागतिक स्पर्धा यांचाही प्रभाव दिसेल.

भारतीय समाजाची एक महत्त्वाची ओळख म्हणजे सांस्कृतिक विविधता. हीच विविधता मनोरंजनाच्या प्रत्येक माध्यमात दिसून येते. मग तो चित्रपट असो, संगीत, नाटक, लोककला, कथाकथन किंवा नव्या पिढीचे अ‍ॅनिमेशन आणि गेमिंग कंटेंट असो. वेव्हज 2025 मध्ये हाच सांस्कृतिक ठेवा जगासमोर मांडण्याचा प्रयत्न होणार आहे. परिषदेचा भर “क्रिएट इन इंडिया” या अभियानावर असून, हे अभियान भारतातील स्थानिक कलेला, प्रतिभेला, आणि नवकल्पनांना एक मोठं जागतिक व्यासपीठ देण्याचं काम करत आहे.

वेव्हज 2025 अंतर्गत क्रिएट इन इंडिया चॅलेंज – सीझन १ सुरू करण्यात आला आहे, ज्यामध्ये देशभरातील तरुण कलाकार, लेखक, अ‍ॅनिमेटर्स, गेम डेव्हलपर्स आणि संगीतकार यांना सहभागी होण्याची संधी आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून 25 विविध प्रकारांच्या स्पर्धा घेतल्या जात आहेत, जसे की वेबटून, मंगा, अ‍ॅनिमे, इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक, गेम डिझाईन इत्यादी. या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवर असलेल्या प्रतिभेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यता मिळण्याची दारे उघडली जात आहेत.

वेव्हज 2025 च्या अजेंडामध्ये फक्त सर्जनशीलतेचा गौरव नाही, तर आशयाच्या सुरक्षिततेवरही भर दिला जात आहे. आजच्या डिजिटल युगात कंटेंट चोरी किंवा पायरेसी ही एक मोठी समस्या आहे. यावर उपाय म्हणून फिंगरप्रिंटिंग, वॉटरमार्किंग, आणि एआय-आधारित ट्रॅकिंग तंत्रज्ञान वापरण्याची गरज ओळखण्यात आली आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि संशोधक परिषदेच्या माध्यमातून एकत्र येऊन अशा समस्यांवर उपाययोजना मांडणार आहेत.

या परिषदेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जगभरातील मीडिया क्षेत्रातील लीडर, निर्माते, दिग्दर्शक, आणि धोरणकर्ते एकत्र येऊन “WAVES Declaration 2025” तयार करणार आहेत. हे घोषणापत्र जागतिक मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील सहकार्य, नियमावली, आणि नैतिकतेबाबत मार्गदर्शक ठरणार आहे. यामुळे भारताला या क्षेत्रातील जागतिक धोरणनिर्मितीत सहभाग घेण्याची संधी मिळेल.

भारतातील मीडिया आणि मनोरंजन क्षेत्र हे सध्या सुमारे 2.3 लाख कोटींचे असून, येत्या काही वर्षांत हे क्षेत्र 4.3 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. WAVES 2025 सारख्या उपक्रमांमुळे रोजगार निर्मिती, नवउद्योगांचे निर्माण, आणि परकीय गुंतवणुकीला चालना मिळण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र तरुणांसाठी संधींचा धमाका घडवून आणणार आहे. विशेषतः अ‍ॅनिमेशन, व्हीएफएक्स, गेम डिझाईन, स्क्रिप्ट राइटिंग आणि डिजिटल मार्केटिंगसारख्या नव्या उपशाखांमध्ये.

WAVES 2025 ही परिषद केवळ एक इव्हेंट नसून, भारताच्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राचा जागतिक प्रवास सुरू करणारा एक ऐतिहासिक क्षण आहे. ‘क्रिएट इन इंडिया’ ही घोषणा आता केवळ नारा राहिलेली नाही, तर ती कृतीत उतरवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. विविधतेने नटलेला भारत, आता जागतिक दर्जाचा कंटेंट तयार करणारा देश म्हणून उभा राहत आहे. ही परिषद भारताच्या सांस्कृतिक, आर्थिक आणि सर्जनशील सामर्थ्याची जागतिक ओळख निर्माण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. WAVES 2025 भारताला कलात्मक भविष्याकडे नेणारा एक प्रकाशस्तंभ ठरणार आहे. त्यामुळे या परिषदेची नोंद केवळ मनोरंजन क्षेत्रातच नाही, तर भारताच्या विकासगाथेतही घेतली जाईल.

सचिन अडसूळ

जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर