मुंबई, दि. २८ : राज्यातील ग्रामीण भागात वैयक्तिक स्वच्छतेसोबतच शाश्वत सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे तसेच गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता राखणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील स्वच्छतेला अधिक गतिमान करण्यासाठी शासनाने लोकसहभागावर भर दिला आहे. सार्वजनिक व घरगुतीस्तरावरील घनकचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करून व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे. त्याचा एक भाग म्हणून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत “कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू” या मोहिमेची ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ही मोहिम दि.०१ मे २०२५ ते दि. १५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, बचतगट, युवक यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
राज्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा- २ अंतर्गत वैयक्तिक शौचालय व सार्वजनिक शौचालयांसह घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, मैलागाळ व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, गोबरधन, इ. या घटकांची कामे प्रगतीपथावर आहेत. राज्याच्या ग्रामीण भागात स्वच्छतेची लोकचळवळ उभी करण्यात यावी. जेणे सदर कामांना अधिक गती प्राप्त होईल. सर्व गावे हागणदारीमुक्त अधिक मॉडेल म्हणून घोषित करून संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करण्याचा शासनाचा संकल्प आहे.
अभियानाचे उद्दिष्टे – गावांची संपूर्ण स्वच्छता करण्याबरोबरच ग्रामीण भागातील सर्व गावांना दृष्यमान स्वच्छतेचा अपेक्षित दर्जा मिळवून ग्रामीण जनतेत स्वच्छते विषयक वर्तणुकीत बदल घडवून आणणे. सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन करून वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच शाश्वत सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व पटवून देणे. घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा व पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी, कचरा कमी करणे, पुनर्वापर करणे.
मोहिम अंमलबजवणी कालावधीचे टप्पे
अभियान कालावधी – दि.०१ मे २०२५ ते दि. १५ सप्टेंबर २०२५
शुभारंभ – महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दि.०१ मे, २०२५.
गावातून कचरा जमा करून नाडेप भरण्याचा कालावधी: दि.०१ मे ते दि. १० मे २०२५.
प्रक्रिया, देखभाल व पडताळणी कालावधी: दि. ११ मे २०२५ ते दि. ३१ ऑगस्ट २०२५
नाडेप खडा उपसणे : दि. ०१ सप्टेंबर ते दि. १५ सप्टेंबर २०२५
लोकप्रतिनिधींचाही सक्रिय सहभाग
राज्यात मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता ग्रामस्थांप्रमाणे लोकप्रतिनिधी यांचाही सक्रिय सहभाग असणार आहे. सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्यसभा सदस्य, लोकसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य, विधानसभा सदस्य, सरपंच यांना मंत्री श्री. पाटील, यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. संबंधित लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघात जाऊन मोहिमेचा शुभारंभ करणार आहेत.
मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व.), गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
गावपातळीवर मोहिमेत यांचा असेल सहभाग
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व अधिकारी/सल्लागार, विस्तार अधिकारी (सर्व), अन्य कर्मचारी, प्रत्येक ग्राम पंचायतीतील ग्राम सेवक, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, ग्राम पंचायत स्तरावरील सर्व शासकीय कर्मचारी, ग्रामस्थ, शालेय, विद्यार्थी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, सर्व महिला बचत गट यांचा सहभाग असेल.
000000
राजू धोत्रे/विसंअ/