पॅराग्लायडींग, ग्रॅन्डसायकलिंग, हॉटएअर बलून फेस्टीव्हलचा समावेश असलेल्या पुणे जिल्हा पर्यटन विकास आराखड्याचे अजित पवार यांच्या बैठकीत सादरीकरण
ऐतिहासिक गडकिल्ले, प्राचीन मंदिरे, निसर्गरम्य घाट परिसरांचा विकास, पॅराग्लायडींग, ग्रॅन्डसायकलिंग, हॉटएअर बलून आदी खेळांचा समावेश
पुणे जिल्ह्यातील पर्यटकांची संख्या पाच वर्षात एक कोटींवर, ५० हजार थेट तर, पाच लाख अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीचे ध्येय – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्धार
श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास व सिंहगड किल्ला परिसर विकास आराखड्याचाही अजित पवारांकडून आढावा
प्रतापगड पायथा परिसरातील जिवाजी महाले यांच्या पुतळा आणि स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई, दि. 28 :- पुणे जिल्ह्यातील मुळशी येथे जागतिक पॅराग्लायडींग स्पर्धेचे आयोजन, जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमधून जाणारी ग्रॅन्डसायकलिंग चॅलेंज स्पर्धा, बारामती व इंदापूरला हॉटएअर बलून फेस्टीव्हल, पवना धरणक्षेत्रात जलक्रीडा पर्यटनाच्या सुविधा, ऐतिहासिक गडकिल्ले, प्राचीन मंदिरे, निसर्गरम्य घाटांचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास, जिल्ह्यातील कलावंताचा सहभागातून गायन, वादन, नाटक, साहित्य, काव्य, कथावाचनासारख्या सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन, पर्यटकांना पर्यटनस्थळे पाहण्याचा आनंद देण्याबरोबरंच साहसी खेळांचा प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या ‘मोटरबोटींग’, ‘झिपलाईन’सारख्या साहसी खेळ सुविधांची निर्मिती अशा अनेक उपक्रमांचा समावेश असलेल्या, शाश्वत अशा पुणे जिल्हा पर्यटन विकास आराखड्याचे सादरीकरण उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत करण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे, लोककला, लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा, पर्यटनवाढीची अमर्याद संधीचा उपयोग करुन पुणे जिल्ह्याचे देशाच्या पर्यटन नकाशावर स्वतंत्र स्थान निर्माण करण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला असून त्याअनुषंगाने जिल्ह्याचा सर्वसमावेशक पर्यटन विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्याच्या पर्यटन विकास आराखड्याचा प्राथमिक मसूदा तयार करण्यात आला असून त्याचे सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील विशेष बैठकीत आज मंत्रालयात करण्यात आले. बैठकीला उपमुख्यमंत्र्याचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदींसह मंत्रालय आणि पुणे जिल्ह्यातील संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आपल्या राज्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांपैकी 79 टक्के पर्यटक मुंबईला भेट देतात तर अवघे 14 टक्के पर्यटक पुण्याला येतात. पुणे जिल्हा पर्यटन विकास आराखड्याच्या यशस्वी आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणीतून येत्या तीन वर्षात जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या चाळीस लाखांवर तर पुढील पाच वर्षात एक कोटींवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यातून जिल्ह्याच्या जीडीपीत दहा ते पंधरा हजार कोटींची वाढ होईल. पन्नास हजार थेट रोजगार तर पाच लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी हाती घेतलेले सर्व उपक्रम हे कायम सुरु राहतील. पॅराग्लायडींग स्पर्धा, ग्रॅन्डसायकलिंग चॅलेंज स्पर्धा, हॉटएअर बलून फेस्टीव्हल, सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन दरवर्षी विशिष्ट कालावधीत नियमितपणे केले जाईल. त्यातून जिल्ह्याच्या पर्यटनक्षेत्राला नवी ओळख मिळेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही यंदाच्या अर्थसंकल्पात पर्यटनवाढीला महत्त्व आणि भरीव निधी दिला असून हा मुद्दा त्यांच्या सर्वोच्च प्राधान्य यादीत आहे. पर्यटन विकासासाठी राज्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले आहे. याचा फायदा महाराष्ट्राला करुन घेत असताना पुणे जिल्ह्यानंही पर्यटनविकासात आघाडीवर असलं पाहिजे. त्यासाठी जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा महत्त्वाचा आहे. यातून जागतिक पर्यटनाच्या नकाशावर पुणे जिल्ह्याचं स्वतंत्र स्थान निर्माण होईल. त्यसाठी जिल्ह्याच्या स्वतंत्र पर्यटन लोगो, स्वतंत्र घोषवाक्य असेल. यातून स्वतंत्र ब्रँन्ड निर्माण होईल शिवाय जागतिक ओळख आणि लोकप्रिय व्यक्तिमत्वं असलेला ‘ब्रॅन्ड अॅम्बॅसॅ़डर’ नियुक्त करण्याचा प्रयत्न करु, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पुणे जिल्हाचा पर्यटन विकास आराखडा तयार करताना अन्य राज्यांचाही अभ्यास करण्यात आला आहे. गुजरात राज्याने कच्छच्या वाळवंटात ‘रणउत्सव’, अरुणाचल प्रदेशने झिरो व्हॅलिमध्ये ‘झिरो फेस्टीव्हल’, राजस्थानमध्ये जयपूरला ‘साहित्य महोत्सव’, नागालॅन्डमध्ये ‘हॉर्नबिल महोत्सव’सारखे सुरु केलेले उपक्रम अपेक्षेपेक्षा यशस्वी ठरले. त्यातून त्या राज्यांच्या पर्यटनाला स्वतंत्र ओळख मिळाली. आर्थिक उलाढाल वाढली. महसूल वाढला. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती झाली. पर्यटनस्थळांच्या मार्गावरील गावांचा, शहरांचा विकास होण्यासही मदत झाली. पुणे जिल्ह्याच्या पर्यटन विकास आराखड्यातूनही आपलीही उद्दीष्टे पूर्ण होतील. त्यासाठी जिल्ह्यातील पर्यटनाशी संबंधित नामांकित, तज्ञ व्यक्ती, संस्था, संघटनांचे सहकार्य घ्यावे. पुणे जिल्ह्याचा पर्यटनविकास आराखडा राबवताना तो सर्वांच्या सहकार्याने, मदतीने राबवावा. शक्य तिथे खासगी संस्था, संघटनांची मदत घ्यावी. राज्य शासनाकडून यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येईल. निधीची कमी भासू दिली जाणार नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिला.
श्रीक्षेत्र भीमाशंकर आणि सिंहगड किल्ला परिसर विकास आढावा
श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा आणि सिंहगड किल्ला समर्ग संवर्धन विकास आराखड्याचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. श्रीक्षेत्र भीमाशंकर आणि सिंहगड किल्ल्याचे आध्यात्मिक, ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन नवीन विकासकामे करण्यात यावी. हे करताना मंदिर आणि किल्ला परिसराचे ऐतिहासिक, प्राचीन सौंदर्य कायम राहील, याची पूर्ण काळजी घ्यावी, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवारा यांनी दिल्या.
जिवाजी महालेंच्या स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करावे
किल्ले प्रतापगडाखाली छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या ऐतिहासिक भेटीच्यावेळी अतुलनीय शौर्य, साहस आणि निष्ठेचे दर्शन घडविणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, जिवाजी महाले यांच्या प्रतापगड पायथा परिसरातील पुतळा आणि स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.