महाबळेश्वर येथे २ ते ४ मे २०२५ रोजी ‘महाराष्ट्र महापर्यटन उत्सव’चे आयोजन – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

महोत्सवात ६० पंचतारांकित टेन्ट्स, लेझर शो, विविध पर्यटन सहली, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Screenshot

मुंबई, दि. २९ : महाबळेश्वर येथे २ ते ४ मे २०२५ रोजी ‘महाराष्ट्र महापर्यटन उत्सव’चे आयोजन केले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने महाबळेश्वर येथे ६० पंचतारांकित टेन्ट्स असतील, त्यात राहण्याची वेगळी अनुभूती लोकांना मिळणार आहे. लेझर शो, विविध पर्यटन सहली, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी महाराष्ट्राच्या महसूली विभागातील महत्वाच्या पर्यटन स्थळाचे ‘ब्रॅण्डींग’ करण्यासाठी महापर्यटन उत्सव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.

मंत्रालयातील  मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सुर्यवंशी, पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल उपस्थित होते.

पर्यटन मंत्री देसाई म्हणाले की, यावर्षी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) वतीने महाबळेश्वर येथे “महापर्यटन उत्सव : सोहळा महाराष्ट्राचा” या तीनदिवसीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 2 ते 4 मे यादरम्यान सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर गीरीस्थानी येथे हा उत्सव संपन्न होणार आहे.

महाराष्ट्र महापर्यटन उत्सवचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन

‘महाराष्ट्र महापर्यटन उत्सव’चे उद्घाटन 2 मे रोजी सायंकाळी 5 वाजता गोल्फ क्लब मैदान इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, यांच्यासह अनेक पर्यटनप्रेमी यावेळी उपस्थित राहतील. या उत्सवाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन भेट देणार असून त्यांच्या हस्ते शनिवार, 3 मे रोजी ‘छत्रपती प्रतापसिंह वन उद्यानाच्या नुतनीकरण पश्चात लोकार्पण सोहळा’ तसेच ‘पेटिट लायब्रेरीच्या नुतनीकरण केलेल्या वास्तूचे’ उदघाटन होणार आहे.

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र पर्यटक सुरक्षा दल

पहलगाम मध्ये पर्यटकांवर झालेला भ्याड हल्ला लक्षात घेता पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ‘महाराष्ट्र पर्यटक सुरक्षा दल’ हा पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. थमिक तत्वावर तीन महिन्यासाठी महाबळेश्वर येथे 3 मे 2025 पासून पर्यटन सुरक्षा दल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत कार्यान्वित होईल. महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचा 4 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.

पर्यटन उत्सवात विविध साहसी उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम

या उत्सवात विविध नामवंत कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम, किल्ले आणि शास्त्र प्रदर्शनी, फूड फेस्टिव्हल, साहसी खेळांचे उपक्रम, मुलांसाठी कार्यशाळा, हेलिकॉप्टर राईड, ड्रोन शो, फूड स्टॉल, मंदिर तथा अन्य पर्यटन स्थळांना भेटी, फोटोग्राफी कार्यशाळा, तरंगता बाजार (फ्लोटिंग मार्केट), लेझर शो, योग सत्र आणि मोर्निंग रागाज – वाद्य संगीत, फन रन आणि सायक्लथॉन परिसंवाद- जल पर्यटनातील संधी, बायोडायनामिक फार्मिंग शाळा, महाराष्ट्राचे पर्यटन धोरण, कार्निवल परेड, हैप्पी स्ट्रीट, बोट प्रदर्शनी व कार्यशाळेचे आयोजन केले आहे. तसेच महाराष्ट्राचे पर्यटन धोरण 2024, जलपर्यटनातील संधी आणि कृषी पर्यटन या विषयांवरील तीन परिषदा होणार आहेत.

महोत्सवात पंचतारांकित टेंट्स आणि हेलिकॉप्टर राईड

महाबळेश्वर इथे 60 पंचतारांकित टेंट्स असतील, त्यात राहण्याची वेगळी अनुभूती लोकांना मिळणार आहे. यातील काही टेंट्स गोल्फ क्लब ग्राउंडजवळ, तर उर्वरित टेंट्स हे मौजे भोसे येथे मॅप्रो गार्डनजवळ असतील. महाबळेश्वर येथील सगळ्या पॉइंट्सचे उंचीवरून दर्शन घेण्याची संधी उत्सवाच्या निमित्ताने उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा टॉप व्ह्यू बघता यावा यासाठी तिन्ही दिवस सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत हेलिकॉप्टर राइडची व्यवस्था मौजे भोसे येथील बाबा दुभाष फार्मवरून करण्यात आली आहे. याशिवाय सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत दुभाष फार्म, पाचगणी टेबल टॉप आणि हॉर्स रायडिंग मैदान तापोळा इथे पॅराग्लायडिंग, पॅरासेलिंग, पाण्यातील खेळ अशा विविध साहसी खेळांच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

किल्ले आणि शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन

महाराष्ट्राचा गड किल्ल्यांचा इतिहास लक्षात घेऊन वेण्णा लेकच्या शेजारील छत्रपती प्रतापसिंह उद्यानात सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत किल्ले आणि शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात स्वराज्यातील 10 मुख्य किल्यांच्या प्रतिकृती बनवल्या जाणार आहेत. तसेच युद्धात वापरल्या जाणाऱ्या जवळपास 1000 शिवकालीन पुरातन शस्त्रांचा समावेश या प्रदर्शनात असणार आहे.

वेण्णा लेकमध्ये लेझर शो आणि किडस झोनची उभारणी

वेण्णा लेक फेस्टिव्हल हे देखील या महोत्सवाचे एक आकर्षण आहे. यात तंत्रज्ञान आणि कलेचा अभूतपूर्व संगम असलेला लेझर अँड लाइट शो 2 आणि 3 मे रोजी सायंकाळी दाखवला जाईल. तर 4 मे रोजी ड्रोन शो होईल. यात साताऱ्याशी निगडित इतिहासाचे सुंदर सादरीकरण 300 ड्रोन्सच्या माध्यमातून करण्यात येईल. उत्सवात सहभागी होणाऱ्या तसेच स्थानिक मुलांसाठी सेठ गंगाधर मखारिया गार्डन इथे किड्स झोनची उभारणी करण्यात येणार आहे. लहान मुलांसाठी कुंभार कला, चित्रकला, कथाकथन, फोटोग्राफी याविषयीच्या कार्यशाळाही आयोजित करण्यात आल्या आहेत.

फूड फेस्टिव्हल आणि फ्ली मार्केटचे आयोजन

महाराष्ट्राची खाद्य परंपरा लक्षात घेऊन उत्सवात तिन्ही दिवस खाद्यप्रेमींसाठी सेठ गंगाधर मखारिया हायस्कूल येथे फूड फेस्टिव्हल आणि फ्ली मार्केटचे आयोजन करण्यात आले आहे. या फूड फेस्टिव्हलमध्ये वैशिष्ट्य म्हणजे यात महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, कोकणसह सर्व ठिकाणच्या प्रसिद्ध खाद्यपदार्थांसोबत सातारा आणि माण भागातील विशेष अशा खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असतील.यासोबतच क्राफ्ट आणि महिलांच्या विविध उत्पादनांचे स्टॉल्स फ्ली मार्केटमध्ये असतील.

कार्निव्हल परेड या भव्य सांस्कृतिक शोभायात्रेचे आयोजन

उत्सवात कार्निव्हल परेड या भव्य सांस्कृतिक शोभायात्रेचे आयोजन 3 मे रोजी सायंकाळी 4 वाजता करण्यात आले आहे. याशिवाय पावली, आदिवासी नृत्य, वासुदेव, गोंधळी, कडकलक्ष्मी, संबळ वादन अशा लोप पावत असलेल्या पारंपरिक कलांचा परिचय करून दिला जाईल. कार्निव्हल परेड साबणे रोडवरील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकापासून निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात परेडचा समारोप होईल.

योग सत्रांचे आयोजन

या उत्सवात 3 व 4 मे रोजी विल्सन पॉइंट येथे सकाळी 6 ते 7 या वेळेत डॉ. गजानन सराफ आणि सहकारी हे योगसत्र घेणार आहेत. पहिल्या दिवशी बासरीवादक अमर ओक हे मॉर्निंग रागाज हा वाद्य संगीताचा कार्यक्रम सादर करतील. फन रन आणि सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. विल्सन पॉइंटपासून सुरू होणाऱ्या या फन रनची सांगता आराम चौकात आराम गेस्ट हाऊसच्या मैदानावर होईल. 4 तारखेला योग सत्रानंतर हॅपी स्ट्रीट या आगळ्यावेगळ्या आनंदमयी सत्राचे आयोजन विल्सन पॉइंट इथे करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यातील पंचगंगा मंदिर, कृष्णाई मंदिर येथे भेटीची व्यवस्था करण्यात आले आहे. अनुभवात्मक पर्यटनांतर्गत ग्रामीण गाव, प्राचीन मंदिर, कृषी पर्यटन, स्ट्रॉबेरी फार्म सहल आयोजित करण्यात येणार आहेत. महापर्यटन महोत्सवात तिन्ही दिवस नामवंत कलावंतांच्या रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी उपस्थितांसाठी असणार आहे. महाराष्ट्राची ऐतिहासिक श्रीमंती पर्यटनाच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचावी या हेतूने राज्य शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या पुढाकारातून आयोजित महापर्यटन महोत्सवात अधिकाधिक पर्यटक सहभागी होतील असेही पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

००००

संध्या गरवारे/विसंअ/