लातूर, दि. ३० : सध्याच्या पाणीटंचाईच्या परिस्थितीत प्रत्येकाने पाण्याच्या वापराबाबत जागरूक होणे आवश्यक आहे. पाण्याची बचत आणि काटकसरीने वापर ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे केले. जलसंपदा विभागाच्या ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५’च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार संजय बनसोडे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त देविदास जाधव, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता तसेच प्रशासक रुपाली ठोंबरे, कार्यकारी अभियंता अमरसिंह पाटील, महेंद्र काळे, रोहित जगताप यांच्यासह लातूर पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
पाण्याचे महत्त्व आपल्या सर्वांना माहीत आहे. मात्र, पाण्याची बचत आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर, यासाठी जलव्यवस्थापन महत्त्वाचे आहे. जलसंपदा विभागाने या पंधरवड्यात राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये पाण्याच्या वापराबाबत जागृती निर्माण होण्यास मदत होईल, असे पालकमंत्री श्री. भोसले यावेळी म्हणाले.
काही जिल्ह्यांमध्ये शेतीसाठी पाण्याचा अतिवापर झाल्याने जमीन क्षारपड होत आहे. त्यामुळे शेतीमध्ये पाण्याचा योग्य वापर व्हावा यासाठी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे. जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यांतर्गत जलसंपदा विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केलेले मार्गदर्शन उपयुक्त ठरेल, असा विश्वास पालकमंत्री श्री. भोसले यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या जलपूजनाने झाली. जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थितांना जल संवर्धन व बचतीची शपथ देण्यात आली.
कार्यकारी अभियंता महेंद्र काळे यांनी प्रास्ताविकात पंधरवड्यात जिल्ह्यात राबवलेल्या उपक्रमांची माहिती सादर केली. यासंबंधीची चित्रफीत यावेळी दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.
००००००