शिक्षकांची राज्यव्यापी आयडॉल बँक तयार करणार – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान पुरस्काराने शाळांचा गौरव

छत्रपती संभाजीनगर दि.30 (विमाका) : शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर शासनाचा भर आहे. देशाचा उद्याचा नागरिक घडविण्यात आई-वडीलानंतर शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. शिक्षण आनंददायी, शिक्षण गुणवत्तापूर्ण यासोबतच शिक्षण भाकरीचे, शिक्षण राष्ट्रीयत्वाचे हे ब्रिद घेऊन शिक्षण विभाग काम करत आहे. प्रत्येक विद्यार्थी आपल्या क्षेत्रात सक्षमपणे उभा रहावा, यासाठी शिक्षकांनी झोकून देत काम करावे, शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शिक्षकांची राज्यव्यापी आयडॉल बँक तयार करणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज केले. आयडॉल शिक्षकाने आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाला आपल्या शाळेपुरते मर्यादित न ठेवता राज्यभर हा उपक्रम कसा पोहचेल यासाठी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात छत्रपती संभाजीनगर विभागातील आयडॉल शिक्षकांशी आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार प्रदिप जैस्वाल, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, विभागीय मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे, शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद, सहायक संचालक रविंद्र वाणी, शिक्षण उपनिरीक्षक डॉ. सतिष सातव उपस्थित होते.

शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले, आयडॉल शिक्षकांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची शासनाकडून दखल घेण्यात येईल. आपल्यासमोर असलेल्या अडचणीतून मार्ग काढून या शिक्षकांनी नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या शाळेची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक जिल्हयाच्या शैक्षणिक विकासासाठी रोडमॅप तयार करण्यात आला आहे. येणाऱ्या कालावधीत शाळांना भौतिक सुविधेसह डिजीटल सुविधा देण्यासाठी शासन कटिबध्द आहे. शिक्षकांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना शासनाचे पूर्ण पाठबळ असल्याचे श्री भुसे यांनी सांगितले.

राज्य शासन येणाऱ्या शैक्षणिक वर्षात आठवीच्या पुढील विद्यार्थीनींना सायकलसाठी अर्थसहाय्य तसेच शालेय विद्यार्थ्याच्या आरोग्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड तयार करणार आहे. हेल्थ कार्ड उपक्रमाच्या माध्यमातून तपासणीत गंभीर आजार आढळला तर त्या विद्यार्थ्याला शासकीय योजनेतून सर्व उपचार शासन करेल. शालेय पातळीवर पुर्वी विविध 15 समित्या कार्यरत होत्या. या समित्यांची संख्या 15 वरुन 4 समित्यांवर आणली आहे. शिक्षकावरील अशैक्षणिक कामाचा भार कमी करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांना शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रीत करता येईल, असे श्री. भुसे म्हणाले.

शालेय विद्यार्थ्यांच्या सहली शेती, कारखाना, किराणा दुकान, बँक, दवाखाना याठिकाणी सहलीचे आयोजन करण्यात येईल. बालवयात मुलांना याबाबी जाणून घेण्याची उत्कंठा असते त्यासाठी अशा सहली निश्चितपणे विद्यार्थ्यांना आनंद देतील. स्पर्धा परीक्षेच्या निकालात 50 टक्के विद्यार्थी हे जिल्हा परिषद व नगरपालिका शाळेत शिक्षण घेतलेले आहेत. ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्य गीत बंधनकारक करण्यात आले आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश श्री. भुसे यांनी दिले.

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमासोबतच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सुरु केलेला शिक्षणाचा दशसुत्री उपक्रम राबविण्यात येईल. शिक्षक, पालक संवाद उपक्रम प्रभावीपणे राबवावा लागेल. शिक्षकांना विद्यार्थ्यांबरोबरच पालकांशी देखील संवाद साधावा लागेल. यातून अनेक अडचणी सुटतील तसेच आई वडीलांनी देखली आपल्या मुलांबरोबर संवाद वाढवावा त्यातून मुलांमध्ये आत्मविश्वास वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, सोलापूर येथे कार्यरत असतांना आपण लोकवर्गणीतून 2670 शाळा सुंदर केल्या आहेत. तसेच सोलापूर येथे विद्यार्थ्यांच्या ‘आरोग्याचा सातबारा’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचा उपक्रम राबविला. ‘शिक्षणाचा दशसुत्री उपक्रम’ यशस्वीपणे राबविला. छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दशसुत्री उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षक व पालकांचे सहकार्य महत्वाीतचे आहे. गीत गुंजण हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु करण्यात आला असून शिक्षकांसाठी पुस्तक  प्रदर्शन, माजी विद्यार्थ्यांची कार्यशाळा यासारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. शैक्षणिक गुणवतेसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर आपला भर असल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूर जिल्हयात कार्यरत असतांना शैक्षणिक विकासासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी राबविलेल्या विविध उपक्रमाबाबत त्यांनी माहिती दिली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित  यांनी आजच्या या कार्यक्रमातून निश्चितपणे शिक्षकांना प्रोत्साहन तसेच ऊर्जा मिळेल. आपले विद्यार्थी विविध क्षेत्रात पुढे जावेत. विद्यार्थ्यांमध्ये नाविण्यता यावी यासाठी अनेक शिक्षक चांगले काम करतात. शिक्षकांच्या नाविण्यपूर्ण उपक्रमाला सर्वातोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उपसंचालक प्रकाश मुकुंद यांनी प्रास्ताविक केले. छत्रपती संभाजीनगर विभागात राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमाबाबत त्यांनी माहिती दिली.

नाविण्यपूर्ण उपक्रमाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती

जालना जिल्हयातील देवीपिंपळगाव (बदनापूर) येथील कृष्णा निहाळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वरवंटी तांडा ता. पैठण येथील भरत काळे, जरेवाडी ता. पाटोदा जि. बीड येथील राहुल डोंगर, सिरसम ता.गंगाखेड जि. परभणी येथील दशरथ मुंडे, सांडस ता. कळमनुरी जि.हिंगोली येथील शंकर लेकुळे तसेच परभणीचे शिक्षणाधिकारी  संजय ससाणे यांनी राबविलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान पुरस्काराने शाळांचा गौरव

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगांव मेटे जि. छत्रपती संभाजीनगर, बोरगव्हान जि. परभणी, देवीपिंपळगाव जि. जालना या शासकीय तर बहीरजी नाईक स्मारक विद्यालय, वसमत जि. हिंगोली, सरस्वती साधना विद्यालय आर्वी जि. बीड, संत ज्ञानेश्वर विद्यालय केरेवाडी जि. परभणी या खाजगी शाळांचा शालेय मंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानातून पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विभागातील सर्व शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, वेतन अधिक्षक, शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.

०००