परभणी, दि. 1 (जिमाका) : परभणी जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी मी कटीबध्द आहे. कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, ऊर्जा, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, युवकांना रोजगार या सर्व बाबींवर प्राधान्याने लक्ष देऊन जिल्ह्याचा विकास केला जाईल, अशी ग्वाही राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडीयमवर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण हे पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या हस्ते पार पाडले. त्यावेळी शुभेच्छा संदेश देताना त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी आदींसह स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, पत्रकार, नागरिक, अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सर्व उपस्थितांना पालकमंत्री यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
आपल्या भाषणात प्रारंभी पालकमंत्री यांनी पहलगाम येथील निष्पाप पर्यटकांच्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या आतंकवाद्यांना धडा शिकविण्याचा विडा उचलला आहे. यामध्ये संपूर्ण देश त्यांच्या पाठीमागे उभा राहिला आहे, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री म्हणाल्या की, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या लढ्यात अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले आणि मराठी भाषिक प्रदेश असलेले आपले महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. भारतीय संघराज्यातील एक प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राचे वेगळे महत्त्व आहे. आपल्या राज्याला स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक सुधारणेचे प्रणेते महात्मा जोतिराव फुले, सामाजिक समतेचा पाया रचणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध समाजसुधारकांची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. या सर्वांचे प्रेरक स्मरण करणे आणि त्या आदर्शांसोबत उज्ज्वल वाटचाल करणे, हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.
मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन कामकाज सुधारणा कृती आराखड्यामध्ये आपल्या जिल्ह्याने उत्कृष्ट कार्य केले आहे, याची खात्री असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, राज्यशासन 8 मे पासून ‘एक पाऊल थॅलेसीमिया मुक्तीकडे’ हे राज्यव्यापी अभियान राबविणार आहे. आपण सगळे मिळून या अभियानात सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करुयात, असे आवाहन करताना स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत आजपासून ते 15 सप्टेंबर 2025 पर्यंत “कंपोस्ट खड्डा भरू… आपले गाव स्वच्छ ठेऊ” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गावाची संपूर्ण स्वच्छता करणे आणि स्वच्छतेबाबतची जनजागृती हा या उपक्रमाचा उद्देश आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपले गाव स्वच्छ व सुंदर ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केली.
पालकमंत्री म्हणाल्या की, परभणी हा कृषीप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना आहेत. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घेऊन शेती समृध्द करावी. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतंर्गत मागील दोन वर्षांत 6 हजार शेतकऱ्यांना 12 कोटी अनुदान अदा करण्यात आले आहे. राज्य शासनाने पर्यावरण पूरक सौर ऊर्जेवर भर दिला आहे. शेतकऱ्यांसाठी अखंडीत वीजपुरठ्याकरीता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबविली जात आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी अवश्य लाभ घ्यावा. याशिवाय कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी आणि शेतकऱ्यांवरील रात्रीच्या वीज पुरवठयाचा ताण कमी करण्याकरीता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही एक राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. जिंतूर तालुक्यातील दुधगाव येथे या योजने अंतर्गत चार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे दुधगाव, आसेगाव आणि कौडगाव येथील शेतकऱ्यांना कृषी सिंचनासाठी सुरळीतपणे वीज पुरवठा मिळत आहे. हरित ऊर्जेसाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना ही सर्वांसाठीच राबविली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे 49 शासकीय कार्यालयांना सोलर बसविण्यासाठी जिल्हा नियोजन मधून मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे कार्यालयांच्या वीज देयकात बचत होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येकांनी देखील आपल्या घराच्या छतावर सोलार पॅनल बसवून सौर ऊर्जेचा वापर करावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेच्या संकेतस्थळावर जाऊन अवश्य नोंदणी करावी. सेलु शहराला राज्यातील पहिली सोलार सिटी करण्याचा आमचा मानस आहे, यासाठी सेलुकरांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा. नुकतेच परभणी येथील महावितरण मंडळ कार्यालयाच्या छतावर 35 किलोवॅट क्षमतेचा सोलर रुफटॉप प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. हरित ऊर्जा निर्मिती करणारे राज्यातील हे पहिले मंडळ कार्यालय ठरले आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असणाऱ्या अॅग्रिस्टॅक योजनेमध्ये सर्व शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, याद्वारे शेतीक्षेत्रात क्रांती येणार असून नियोजन व योजनांची अमलबजावणी सुकर होणार आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाल्या की, लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अनुषंगाने 28 एप्रिल रोजी पहिला सेवा हक्क दिन साजरा करण्यात आला. जिल्ह्यामध्ये मागील आर्थिक वर्षात 4 लाख 61 हजार प्राप्त अर्जांपैकी 4 लाख 36 हजार इतक्या म्हणजे 95 टक्के सेवा प्रदान करण्यात आल्या.
परभणी जिल्ह्यात आरोग्याच्या सुविधा अधिक बळकट करण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही देऊन त्या म्हणाल्या की, सेलु येथे नुकतेच सेवा संकल्प शिबीरा अंतर्गत महाआरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून अनेक रुग्णांनी आरोग्य तपासण्या केल्या. जिल्हा रुग्णालयात नुकतेच एन्डोस्कोपी सेंटरचे लोकार्पण करण्यात आले आहे. मराठवाडयातील हे पहिले सेंटर असून या ठिकाणी अन्ननलिकेच्या आजाराचे त्वरीत निदान केले जाते. या रुग्णालयात या महिन्यात एमआरआय सेंटर आणि कॅथलॅबचीही सुविधाही सुरु करण्यात येणार आहे. रुग्णांच्या सेवेसाठी सेलू आणि पालम येथे डायलिसीस केंद्र सुरु करण्यात आले आहे. लवकरच पूर्णा, जिंतूर, गंगाखेड येथे मोफत डायलिसीसची सेवा सुविधा उपलब्ध होणार आहे. मोठ्या शस्त्रक्रियेमध्ये राज्यात व्दितीय क्रमांकावर आल्याबद्दल गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयाला गौरविण्यात आले आहे. परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे लवकरच माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात येणार आहे. अठरा महिन्यात या इमारतीचे काम पूर्ण केले जाईल.
शासनाच्या योजना तळागळापर्यंत नेण्यासाठी व त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळण्याकरीता जिल्ह्यात पालकमंत्री टास्क फोर्सच्या माध्यमातून विभागप्रमुखांना 100 गावे दत्तक देण्यात आली आहेत. येत्या पाच वर्षात सुमारे 500 गावांचा या उपक्रमाच्या माध्यमातून कायापालट करण्यात येणार आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी लखपती दीदी योजना, महिलांची क्रेडीट सोसायटी यासारखे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. महिला बचतगटांनाही सक्षम केले जाईल. लखपती दीदी योजने अंतर्गत दोन लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ते एक वर्षातच पूर्ण केले जाईल. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. त्यामुळे चिंता करु नये. परभणी जिल्ह्यातील सुमारे चार लाख पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ दिला जात आहे, असे त्यांनी सांगितले.
बालविवाह ही आपल्या समाजासमोरील एक गंभीर समस्या आहे. या समस्येविरुद्ध लढा देण्यासाठी परभणी जिल्हा परिषदेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्वसामान्य जनतेसाठी बालविवाह विषयी आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपण सर्वांनी ही माहिती वाचून इतरांपर्यंत पोहोचवावी आणि बालविवाहाची अनिष्ठ परंपरा थांबवावी, असे त्यांनी आवाहन केले.
पालकमंत्री म्हणाल्या की, जेष्ठ नागरिकांना जीवन सुकरपणे जगण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत जिल्ह्यातील 14 हजार 192 वयोवृध्द लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी तीन हजार रुपये अदा करण्यात आले आहेत. स्वत:च्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, मोदी आवास घरकुल योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ अवश्य घ्यावा.
जिल्ह्याच्या क्रीडा विकासावरही भर दिला जात आहे. तरुणांना खेळासाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. पुर्णा, जिंतूर, सेलु व गंगाखेड येथील क्रीडा संकुल लवकरच कार्यान्वित होणार आहे. तर उर्वरित तालुक्यातही जलदगतीने क्रीडा संकुल उपलब्ध करुन दिले जातील. जिल्हा क्रीडा संकुलाचाही कायापालट केला जाईल. या ठिकाणी खेळाडुंसाठी अत्याधुनिक सूविधा उपलब्ध केल्या जातील. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत शासकीय व खाजगी अशा 239 आस्थापनांवर सुमारे 2 हजार 205 प्रशिक्षणार्थींना काम करण्याची संधी देण्यात आली आहे. तर सुशिक्षीत बेरोजगारांसाठी मागील वर्षात जिल्ह्यात पाच पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावे घेण्यात आले आहेत. या माध्यमातून 945 बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी प्राप्त झाली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत परभणी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे एक हजार 700 लाभार्थ्यांना रुपये 117 कोटींचे कर्ज बँकांमार्फत वाटप करण्यात आले आहे. तर या सर्व लाभार्थ्यांना रुपये 12 कोटी इतका व्याज परतावा देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
जल जीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील सर्व घरांना पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात सुमारे 2 लाख 56 हजार घरांना नळ जोडणी देण्यात आली आहे. उर्वरित नळ जोडण्या जून अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. जलसंधारण विभागाने जलव्यवस्थापन कृती पंधरवडा उत्तम प्रकारे साजरा केला असून यातून कृषी व पेयजलाची अमूल्यता समजावण्यात आली आहे. जिल्ह्यात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असला तरी नागरिकांनी पाण्याचा काळजीपूर्वक वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कामगारांच्या कल्याणासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. चालू वर्षात जिल्ह्यातील सुमारे 33 हजार 382 कामगारांना विविध योजनेतंर्गत रुपये 59 कोटींचा लाभ देण्यात आला आहे. 91 हजार 700 कामगारांना गृह उपयोगी वस्तुंचा संच वाटप करण्यात आला आहे. तर 51 हजार 478 कामगारांना सुरक्षा संच देण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व लाभ वाटपाच्या मदतीसाठी दि. 15 मार्चपासून तालुका स्तरावर “तालुका कामगार सुविधा केंद्रा”ची स्थापना करण्यात आली आहे. याचा लाभ बांधकाम कामगारांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन केले.
जिल्ह्यात गुंतवणूक व निर्यात वाढीकरीता नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत 76 उद्योग घटकांनी सामंजस्य करार केले आहेत, असे सांगून त्या म्हणाल्या की, या माध्यमातून रुपये एक हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून तब्बल 2 हजार 300 रोजगार संधी उपलब्ध होणार आहे.
कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सदैव सक्रीय असते. आपल्या जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता जनतेनेही पोलीसांना सहकार्य करावे, असे पालकमंत्री यांनी आवाहन केले.
प्रारंभी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पोलिस, गृहरक्षक दल तसेच अन्य जवानांच्या पथ संचलनाचे निरिक्षण करुन संचलनाची मानवंदना स्वीकारली. यावेळी पालकमंत्री यांनी स्वातंत्र्यसैनिक आणि उपस्थित नागरिकांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तत्पुर्वी पालकमंत्री यांच्या हस्ते दिव्यांग मुलांसाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते मधुकर नायक यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्काराने ब्राम्हणगाव, अंबरवाडी, काजळी रोहीणा, पाळोदी, हदगाव खु, लासीना, सिरसम, तेलजापूर, महागाव या गावांना सन्मानित करण्यात आले. सेवा हक्क अधिनियम अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार देऊन बालकिशन भोसले यांचा सन्मान करण्यात आला. शिक्षण विभागाकडून वसुंधरा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील पूर्वा कुणाल गायकवाड (प्रथम), समीक्षा प्रमोद ढेंबरे (व्दितीय) आणि स्वराली नरेंद्र देशपांडे (तृत्तीय) या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. जटील गुन्हयांची उकल केल्याबद्दल उत्कृष्ट पोलीस अधिकारी-कर्मचारी म्हणून विवेकानंद पाटील, राजु मुत्येपोड, मधुकर चट्टे, सुग्रिव केंद्रे, निलेश भुजबळ यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते बालविवाह मुक्त भारत आणि गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या जनजागृतीपर चित्ररथाचे हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक प्रविण वायकोस यांनी केले.
0000