मुंबई, दि.4 :- “भारतीय लोकांना जुन्या आठवणीत रमायला आवडते. एकीकडे जुनी पिढी त्यांच्या तरुणपणातील जादू पुन्हा जगायचा प्रयत्न करत आहे. जुने अभिजात चित्रपट निखळ मनोरंजनापेक्षाही आपल्या सामूहिक सांस्कृतिक अस्मिता आणि वारशाचे प्रतिबिंब आहेत. चित्रपट पुनर्संचयित करणे ही एक बारीकसारीक तपशिलांबाबत जागरुक राहण्याची प्रक्रिया आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह, आपण मूळ संकल्पनेशी प्रामाणिक राहू शकतो. असे पत्र सूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरो, अहमदाबादचे अतिरिक्त महासंचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितले.
वेव्हज -2025 – जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेमध्ये आज स्मृतीरंजनापलीकडे संवर्धित अभिजात चित्रपटांचा व्यवसाय या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
चित्रपट प्रकाशन आणि वितरण क्षेत्रातील दिग्गज कमल गिआनचंदानी यांनी सांगितले की, भारत सरकारच्या नेतृत्वाखालील महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान या उपक्रमाबद्दल विस्तृत माहिती दिली, ज्याचा उद्देश चित्रपटविषयक खजिन्याचे जतन करणे, डिजिटायझेशन करणे आणि पुनर्संचयित करणे हा आहे.. हे आव्हान खूप मोठे आहे, विशेषतः तापमान आणि आर्द्रता यासारख्या घटकांमुळे तसेच डिजिटल डेटा जतन करण्याच्या वाढत्या जटिलतेमुळे चित्रपट रील्सवर परिणाम होतो . मात्र तरीही, ही जबाबदारी तातडीने आणि समर्पित भावनेने पार पाडायला हवी “, असे मगदूम यांनी सांगितले.
शहजाद सिप्पी यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रातल्या उत्क्रांतीचा मागोवा घेत, मागील दशकातील कथात्मक मांडणीच्या शैलीतले वेगळेपण उपस्थितांसमोर मांडले आणि अभिजात सिनेमांच्या अद्वितीय वारशाची जाणिव उपस्थितांना करून दिली. त्या काळी चित्रपट निर्मिती ही एक वेगळीच कला होती आणि आजचे प्रेक्षकही त्या काळाचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, चित्रपटांच्या संवर्धनासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक, वेळ आणि कौशल्यपूर्ण साधन सामग्रीची आवश्यकता असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.
०००