सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली संतुलित आहार – आहारतज्ञ ऋजुता दिवेकर

मुंबई, दि. ७ : आपण रोज जेवतो तोच खरा आहार (डाएट) असतो. त्यामुळे त्यात पोषणमूल्यांची योग्य सांगड घालणे अत्यंत आवश्यक आहे. घरच्या घरी बनवलेले पारंपरिक पदार्थ हेच शरीरासाठी सर्वोत्तम असतात कारण ते नैसर्गिक, पचायला हलके आणि संतुलित असतात. सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली ही अशाच संतुलित आहारात दडलेली आहे, असे आहारतज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सांगितले.

टेक-वारी कार्यक्रमात मंत्रालयात ‘आरोग्यदायी जीवनशैली’ या विषयावर ऋजुता दिवेकर यांचे व्याख्यान झाले.

आहारतज्ञ ऋजुता दिवेकर म्हणाल्या, आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवतात. मात्र, संतुलित आणि नैसर्गिक आहाराच्या मदतीने आरोग्य सुदृढ ठेवता येते. पौष्टिकतेचा विचार करता आहारात फळे, भाज्या, घरी बनवलेले अन्न, योग्य प्रमाणातील कार्बोहायड्रेट्स, प्रथिने यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला. वेळेवर आणि योग्य प्रमाणात खाणे हेच दीर्घकालीन आरोग्याचे गमक आहे.

आठवड्यातून किमान तीन दिवस तरी नियमित व्यायाम करा, चालण्याची सवय लावा आणि शक्य असल्यास लिफ्टऐवजी जिने चढा. यामुळे शरीर सक्रिय राहते आणि आरोग्य सुधारते.

प्रत्येकाला तंदुरुस्त राहायचे असेल, तर मोबाईल आणि टीव्ही यासारख्या स्क्रीनवर खर्च होणारा वेळ कमी करणे आवश्यक आहे. लोकल, सिझनल आणि पारंपरिक (ट्रेडिशनल) पदार्थ खाण्यावर भर द्यावा. पॅकेटबंद आणि प्रक्रिया केलेल्या (प्रोसेस्ड) अन्नापासून शक्यतो दूर राहणे आरोग्यास हितावह आहे, असे सांगत दिवेकर यांनी प्रत्येक वयोगटातील व्यक्तींच्या आहार आणि आरोग्याच्या गरजांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

००००

शैलजा पाटील/विसंअ