मुंबई दि. ७ :- नाशिक विभागात मत्स्यव्यवसायास अधिक गती देऊन विभागास दिलेले मत्स्योत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज दिल्या.
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री. राणे यांनी मंत्रालयात नाशिक मत्स्यव्यवसाय विभागाचा आढावा घेतला. यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, सह आयुक्त (भूजल) अभय देशपांडे, नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त ना. वि. भादुले यांच्यासह नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. राणे म्हणाले, नाशिक विभागात मासेमारीसाठी ३३ हजार ७४७ तलाव असून १ लाख २ हजार ७८७ हेक्टर जलक्षेत्र असल्याने मत्स्योत्पादनाची मोठी क्षमता आहे. नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील जल क्षेत्रात मत्स्योत्पादन वाढीसाठी सूक्ष्म नियोजन करावे. पाटबंधारे विभागाशी समन्वय साधून मासेमारी तलावातील गाळ काढण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
मत्स्यव्यवसाय विभागाने मासेमारीचा ठेका दिलेल्या तलावात अनधिकृतपणे मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश देऊन मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. राणे म्हणाले, विभागाच्या अधिकाऱ्यांनी मासेमारी तलावास नियमित भेटी देऊन याबाबतचा आढावा घ्यावा. मासेमारी तलाव नियमित भेटीबाबत प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
०००००
एकनाथ पोवार/विसंअ