छत्रपती संभाजीनगर, दि.7, (विमाका) :- केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज येथील जीवन विकास प्रतिष्ठानला भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांशी आस्थेवाईकपणे विचारपूस करून संवाद साधला.
यावेळी ज्येष्ठ नागरिक, माहिला यांच्याशी संवाद साधताना श्री.कुमार म्हणाले की, आपल्याशी संवाद साधण्याचा मनस्वी आनंद होत आहे. मी देशाभरातील वृद्धाश्रमांना भेट देतो, वृद्धाश्रमांना केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाते. या संस्थेद्वारे चांगल्या प्रकारे भोजनाची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी असलेले ज्येष्ठ नागरिक आणि महिला भजन करतात हे मनाला भावले. वृद्धाश्रमात चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. ही सेवा एक महान सेवा आहे. आपल्या संस्थेला सद्यस्थितीत 25 जागांची उपलब्धता आहे. संस्थेने प्रस्ताव सादर केल्यास तातडीने 50 जागांची उपलब्धता करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी आमदार प्रशांत बंब, प्रविण घुगे, संदिप चाटे, मोहन नाना साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी डी.एन.टी बोर्ड भारत सरकार श्री. आप्पाराव, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त श्री.जलील, संस्थेच्या अध्यक्षा ज्योती सीताराम विधाटे, संस्थेचे सचिव पंढरीनाथ दारुटे उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री श्री.कुमार पुढे म्हणाले की, भारतीय संस्कृती ही एकत्र कुटूंब पद्धतीची आहे. एकत्र कुटूंब पद्धतीत सर्व जण वेगवेगळ्या कौटूंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असत. एकत्र कुटुंब पद्धतीत एक वेगळा आनंद आहे.
यावेळी महिला व पुरुषांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. केंद्रीय मंत्री श्री.कुमार यांनी स्वागत न स्वीकारता वृद्धाश्रमातील महिलांचे व पुरुषांचे स्वागत करून मी आपणाशी संवाद साधण्यासाठी आलो आहे, माझे स्वागत करण्यापेक्षा मीच तुमचे स्वागत करतो असे सांगितले.
यावेळी नागरिक उपस्थित होते.