जळगाव, दि. 8 (जिमाका वृत्तसेवा) – जिल्ह्यात 6 आणि 7 मे रोजी झालेल्या अवकाळी पावसासह वादळामुळे सुमारे 7 हजार 235 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगाव व चोपडा तालुक्यातील वादळग्रस्त भागांची पाहणी केली. शेतकऱ्यांना धीर देत त्यांनी स्पष्ट केले की, एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही.
या पाहणी दौऱ्यात पालकमंत्र्यांसोबत आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, तहसीलदार व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांना धीर दिला. त्यांनी प्रशासनाला त्वरित पंचनामे करून शासकीय मदतीची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले. पंचनाम्यात गट नंबर निहाय मदत पात्रतेचा स्पष्ट उल्लेख करून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. मागील वर्षी 360 कोटींच्या मदतीपैकी 60 कोटी रुपये ‘ना हरकत प्रमाणपत्र’ अभावी अडकल्याचे त्यांनी सांगितले.
विमा कंपनीसोबतच्या बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात येणार असून, 100 टक्के नुकसानाची नोंद घेऊन विमा कंपनीला कळवण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी नमूद केले. महावितरण विभागाला तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे नमूद करत पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाधिक नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावी अशी आग्रही मागणी केली.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतकऱ्यांना पंचनाम्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व काय करावे-करू नये याबाबत मार्गदर्शन केले. महसूल व कृषी विभागाचे संयुक्त पथक पुढील 72 तासांत पंचनामे पूर्ण करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी शेतकऱ्यांना 15 मेपूर्वी ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन केले.
या दौऱ्यात पालकमंत्री पाटील यांनी जळगाव तालुक्यातील भादली(खु.), कठोरा, किनोद, सावखेडा(खु.), करंज तसेच चोपडा तालुक्यातील धानोरा गावांचा दौरा केला.
शेतकरी आजीचे पुसले अश्रू…
भादली (खु.) येथील शेतकरी भगवान पाटील यांच्या मुलाची केळीची बाग वादळामुळे सपाट झाल्याचे पाहून पालकमंत्रीही भावुक झाले. त्यांची वृद्ध आई हिराबाई पाटील रडायला लागल्या तेव्हा शेतकरी असलेल्या पालकमंत्र्यांनी स्वतः पुढे येऊन त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. शासन केवळ आपली वेदना ओळखत नाही, तर थेट शेतात येऊन तुमच्या दु:खात सहभागी होत असल्याचे हे दृश्य दाखवून गेले.
दौऱ्यादरम्यान नांद्रा खु. (ता. जळगाव) येथील भागाबाई जगन पाटील या महिलेला वादळात डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्या विधवा असून सध्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या तब्येतीची माहिती मिळताच पालकमंत्री पाटील यांनी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, डॉ . पोटे यांच्याशी संपर्क साधून, त्यांच्या उपचारासाठी न्युरो सर्जनची गरज आहे, त्याला लागणाऱ्या खर्चाचे बघू म्हणून त्वरीत ऑपरेशनची तजवीज करण्याचे निर्देश दिले. या संपूर्ण दौऱ्याला शासकीय जबाबदारीसह एक भावनिक किनार लाभलेली होती.
०००००