जळगाव दि. 8 (जिमाका वृत्तसेवा ) : जिल्ह्यातील आदिवासी भागांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत एकूण 15 तालुक्यांमध्ये 112 गावांमध्ये सदर योजना अंमलबजावणी करण्यात येणार आहे, त्यापैकी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत 56 गावाचा सर्वेक्षण करण्यात आल्यानुसार चोपडा यावल व रावेर या तीन तालुक्यांचा केंद्रिय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील,खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल , प्रकल्प संचालक राजू लोखंडे, उपवन संरक्षक, यावल जमीर शेख,प्रकल्प अधिकारी , यावल अरुण पवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला आणि खालील महत्त्वाच्या सूचना दिल्या:
घरकुल योजना: यावल, रावेर आणि चोपडा तालुक्यातील प्रलंबित घरकुलांची कामे तांत्रिक अडचणी दूर करून त्वरित पूर्ण करावीत.
ग्रामीण रस्ते: मुख्य रस्त्यांपासून गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण किंवा डांबरीकरण करावे.
विद्युतीकरण: सर्व घरांमध्ये वीज जोडणी करून भागांचे विद्युतीकरण करावे.
आयुष्यमान कार्ड: चोपडा, रावेर आणि यावल तालुक्यातील उर्वरित नागरिकांची आयुष्यमान कार्ड स्वस्त धान्य दुकानांमार्फत त्वरित तयार करावीत. सध्या चालू असलेल्या शिबिरामध्ये 7000 पेक्षाही जास्त आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी करण्यात आले आहेत
एलपीजी कनेक्शन: आदिवासी कुटुंबांसाठी एलपीजी कनेक्शन आणि उज्ज्वला गॅस योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी.
अंगणवाडी केंद्रे: अंगणवाडी केंद्र बांधण्याचे काम तातडीने पूर्ण करावे.
कौशल्य विकास: आदिवासी विभागातील युवकांना कौशल्य विकास विभागामार्फत प्रशिक्षण द्यावे.
पोषण आहार: आदिवासी भागातील लोकांच्या पोषण आहाराच्या स्थितीत सुधारणा करावी.
वनहक्क योजना: मंजूर वैयक्तिक वनहक्क धारकांसाठी शेतीविषयक शाश्वत योजना राबवाव्यात.
मत्स्यव्यवसाय योजना: मंजूर सामूहिक वनहक्क धारकांसाठी मत्स्यव्यवसाय योजना राबवाव्यात.
राज्यमंत्री खडसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.