खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक
चंद्रपूर, दि. 10 मे : खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. या हंगामावरच शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा वर्षभर उदरनिर्वाह होतो. त्यामुळे जिल्ह्यात खते, बियाणे यांची मुबलक उपलब्धता ठेवून शेतकऱ्यांसाठी अतिशय सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केल्या.
नियोजन सभागृह येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, कीर्तीकुमार भांगडिया, करण देवतळे, देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रीना जनबंधू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माचे संचालक अरुण कुसळकर आदी उपस्थित होते.
खतेलिंकिंग संदर्भात जिल्ह्यात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, लिकिंग संदर्भात लवकरच आढावा बैठक घेण्यात येईल. हा विषय राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठकीत सुद्धा मांडण्यात येईल. शेतकऱ्यांना बँकांनी त्वरित पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, शेतकऱ्यांची अडवणूक करू नये. तसेच शेतकऱ्यांच्या योजनांचा निधी /अनुदान बँकांनी पीक कर्जात कापू नये. जिल्ह्यात चोर बीटीची वाहतूक, विक्री, साठवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यासाठी पथके तयार करून गस्त घालावी. गाव स्तरावरील कृषी यंत्रणेने प्रत्यक्ष गावात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. जिल्ह्याच्या कृषी विषयक बाबींची माहिती राज्यस्तरीय बैठकीत मांडण्यात येईल, असेही डॉ. उईके यांनी सांगितले.
आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर हा धानाचा जिल्हा आहे. एक जिल्हा एक उत्पादन या अंतर्गत चंद्रपूरमध्ये ध्यान अधोरेखित झाले आहे. राज्य सरकारने धरणाचे उत्पादन तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी चंद्रपूर जिल्ह्याला दरवर्षी 20 कोटी रुपये द्यावे. शेततळ्याचे अनुदान 75 हजार रुपयावरून 90 हजार रुपये करावे. रोजगार हमी योजनेचे प्रलंबित 45 कोटी रुपये ताबडतोब जिल्ह्याला मिळावे. तसेच शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्याचे धोरण ठरवावे, अशी मागणी आमदार मुनगंटीवार यांनी केली. यावेळी इतरही आमदारांनी सूचना केल्या.
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 5 लक्ष 52 हजार 729 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. यात सर्वसाधारण खरीप क्षेत्र 4 लक्ष 58 हजार 729 तर सर्वसाधारण रब्बी क्षेत्र 88,245 आहे. जिल्ह्यात भात, सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी ही महत्त्वाची पिके असून सन 2025- 26 करिता एकूण 4 लक्ष 75 हजार हेक्टरवर खरीप लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगाम 2025 साठी जिल्ह्यात 64583 क्विंटल बियाणांची मागणी नोंदविण्यात आली आहे. तसेच खरीप हंगामाकरीता 1 लक्ष 67 हजार 178 मेट्रीक टन रासायनिक खतांचे वावंटन प्राप्त झाले आहे. यावर्षी 1250 कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे नियोजन आहे, असे बैठकीत सांगण्यात आले.
तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते शेतीविषयक योजनांच्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. हरीतक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाचे सुरूवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले. बैठकीला कृषी विभागाचे अधिकारी, बँकेचे अधिकारी, कृषी केंद्र संचालक आदी उपस्थित होते.