येत्या काळात आरोग्य क्षेत्रातील सर्वच विभागांसाठी पुरस्कार सुरु करणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर येथे पहिल्या राज्यस्तरीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कारांचे वितरण संपन्न

कोल्हापूर, दि. १२ मे : ‘ज्याप्रमाणे परिचारिकांना फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित केले जाते, त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील इतरही विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी गौरविण्यात येईल,’ अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली.

कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे आयोजित राज्यस्तरीय नाईटिंगेल पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. या वेळी ते म्हणाले, ‘कोरोना काळाने आरोग्य यंत्रणेचे महत्त्व अधोरेखित केले असून, यापुढेही आरोग्य क्षेत्रातील सर्व घटकांनी असेच समर्पित कार्य करून योगदान द्यावे.’ या कार्यक्रमात खासदार धैर्यशील माने, आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक-१ डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक-२ डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ. दिलीप माने, सहाय्यक संचालक डॉ. नीलिमा सोनावणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी आणि पुरस्कार प्राप्त परिचारिका उपस्थित होत्या.

१२ मे रोजी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. हा दिवस फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या जन्मदिनी साजरा होतो. ‘परिचारिकांची काळजी घ्या, अर्थव्यवस्था मजबूत करा’ असे यावर्षीचे घोषवाक्य आहे. या कार्यक्रमात पहिल्याच वर्षी देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार रक्कम, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले की, राज्यात सध्या ३५ एएनएम, २३ जीएनएम प्रशिक्षण संस्था कार्यरत असून, नागपूर येथे सार्वजनिक आरोग्य परिचारिका संस्था, ठाणे व पुणे येथे मनोरुग्ण तज्ञ परिचारिका प्रशिक्षण संस्था, आणि जालना येथे बीएससी नर्सिंग महाविद्यालय कार्यरत आहे. यावर्षी इचलकरंजी येथे नवीन जीएनएम प्रशिक्षण संस्था, तसेच सातारा, सिंधुदुर्ग व नाशिक येथे बीएससी नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. येत्या काळात प्रशिक्षण, चांगल्या विषयांसाठी एक्सपोजर आणि रिफ्रेशर प्रशिक्षणे होणे महत्त्वाचे आहे. सर्वसामान्य लोकांना समजून घेत अधिक सेवा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

खासदार धैर्यशील माने म्हणाले, ‘परिचारिका हा व्यवसाय नसून एक व्रत आहे. या सेवेचे आधुनिकीकरण करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. कोल्हापूर आणि मिरज भागात उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध असून, कोल्हापूर जिल्ह्याला वैद्यकीय हब म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय कंदेवाड यांनी केले, तर आभार डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी मानले. यावेळी उपस्थित परिचारिकांनी सेवेबाबत हातात दिवे घेऊन सामूहिक प्रतिज्ञा घेतली.

राज्यस्तरीय नाईटिंगेल पुरस्कार विजेत्या परिचारिका :

  • आधिसेविका गट : रमा गोविंदराव गिरी, जिल्हा रुग्णालय, बीड
  • आधिसेविका गट : डॉ. शुभांगी नामदेवराव थोरात, जिल्हा रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर
  • सहाय्यक अधिसेविका गट : आशा वामनराव बावणे, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली
  • सहाय्यक अधिसेविका गट : वंदना विनोद बरडे, उपजिल्हा रुग्णालय, वरोरा, जिल्हा चंद्रपूर
  • सहाय्यक अधिसेविका गट : उषा चंद्रकांत बनगर, उपजिल्हा रुग्णालय, अंबरनाथ, जिल्हा ठाणे
  • सार्वजनिक आरोग्य परिचारिका गट : ममता किशोर मनठेकर, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला

तसेच याठिकाणी कोल्हापूर जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले.

यातील विजेते

जीएनएम संवर्ग:

  • प्रथम : कल्पना रमेश रत्नाकर, वसाहत रुग्णालय, गांधीनगर
  • द्वितीय : जयश्री रणवरे, सेवा रुग्णालय, कसबा बावडा
  • तृतीय : सुद्धा उत्तम बरगे, उपजिल्हा रुग्णालय, कोडोली
  • चतुर्थ : विद्या शशिकांत गिरी, सेवा रुग्णालय, कसबा बावडा

एलएचव्ही संवर्ग:

  • प्रथम : उमा शहाजी बोते, प्राथमिक आरोग्य केंद्र, हुपरी
  • द्वितीय : गौरी केशव कारखानिस, प्राथमिक आरोग्य केंद्र, बांबवडे
  • तृतीय : सुनिता धनाजी देसाई, प्राथमिक आरोग्य केंद्र, कडगाव

एएनएम संवर्ग:

  • प्रथम : मनीषा भोपाल कांबळे, उपकेंद्र रुकडी, पी.आ.केंद्र हेर्ले
  • द्वितीय : अश्विनी शिवाजी वारके, उपकेंद्र म्हासरंग, पी.आ.केंद्र पाटगाव
  • तृतीय : मीता भिमसी पवार, उपकेंद्र बोरबेट, पी.आ.केंद्र गारिवडे
  • चतुर्थ : शुभांगी लक्ष्मण पाटील, उपकेंद्र तांबुळवाडी, पी.आ.केंद्र माणगाव