‘कबड्डी’तून खेळाडूंचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा समारोप

वर्धा, दि.१२ (जिमाका)  : ग्रामीण भागातील तरुणाईला कबड्डी या खेळाची विशेष आवड आहे. अतिशय कमी गुंतवणुकीत हा खेळ खेळता येतो. या खेळामध्ये प्रचंड चपळाई, संयम, आक्रमकतेची आवश्यकता असते.  या खेळाच्या माध्यमातून खेळाडूंचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज येथे केले.

कबड्डी असोसिएशन विदर्भ संघ, नागपूर व अॅम्युचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ते १२ मे या कालावधीत देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आज अंतिम सामना व बक्षिस समारंभ रामनगर येथील शहीद भगतसिंग मैदानावर आयोजित करण्यात आला. या स्पर्धेच्या समारोप सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

आदिवासी विकास मंत्री प्रा.डॅा.अशोक उईके,  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार समीर कुणावार, आमदार सुमित वानखेडे, आमदार राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, माजी आमदार सागर मेघे, सिने अभिनेते सुनील शेट्टी आदी यावेळी उपस्थित होते.

कबड्डी हा खेळ अतिशय प्राचीन आहे. महाभारतामध्ये या खेळाचा उल्लेख सापडतो. संत तुकारामांच्या अभंगात देखील कबड्डीचा उल्लेख आपल्याला आढळतो. देशाचा पारंपारिक खेळ म्हणून कबड्डीकडे पाहण्यात येते. कबड्डी या खेळाला देशी खेळामध्ये अत्यंत महत्त्व असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

वर्धा येथे फुटबॉलचे ‘एक्सलन्स सेंटर’ सुरू व्हावे – पालकमंत्री डॅा. पंकज भोयर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचे क्रीडा क्षेत्र वृद्धिंगत व्हावे यासाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. येत्या काळात जिल्हा तसेच तालुकास्तरावरही अशाच स्पर्धा आयोजन करण्याचा प्रयत्न राहणार आहे. ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धा महत्त्वाच्या असतात. या स्पर्धेत देशभरातील एकूण 27 पुरुष संघ आणि 22 महिला संघ सहभागी झाले होते. जम्मू काश्मीर,  लडाख या भागातील स्पर्धकही या स्पर्धेत उत्साहाने सहभागी झाले होते. वर्धा जिल्ह्यात फुटबॉलप्रेमींची संख्या व आवड लक्षात घेता जिल्ह्यात फुटबॉलचे ‘एक्सलन्स सेंटर’ सुरू व्हावे, असा मनोदय यावेळी गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॅा.पंकज भोयर यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी खासदार तथा विदर्भ कबड्डी असोसिएशन संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी केले. प्रास्ताविकात श्री. तडस यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका व उद्देश याविषयीची माहिती दिली. खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त करीत या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेची अंतिम लढत पुरुष गटात दिल्ली विरुद्ध मध्य प्रदेश तर महिला गटात हरियाणा विरुद्ध पश्चिम बंगाल अशी पहायला मिळाली.