रायगड जिमाका दि. 18- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज रायगड जिल्ह्यातील महामार्गाच्या कामाची हवाई आणि प्रत्यक्ष पाहणी करून काम पूर्ण करताना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला. महामार्गावरील अपूर्ण पूल, बाह्य वळणे आणि सर्विस रोडची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच या महामार्ग संदर्भात मंत्रालयात वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन ज्या कामांसाठी राष्ट्रीय महामार्ग तर्फे निधी उपलब्ध होऊ शकत नाही त्यासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
माणगाव येथील आनंद भुवन सभागृहात मुंबई गोवा महामार्ग आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले उपस्थित होते.
या बैठकीत रायगड जिल्ह्यातील पनवेलपासून ते महाड पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचा आढावा घेण्यात आला. माणगाव व इंदापूर येथील वाहतूक कोंडी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामामध्ये होणाऱ्या दिरंगाई बद्दल नाराजी व्यक्त केली. नागरिकांना सेवा देण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहॆ. त्यामुळे जिथे केंद्राकडून निधी उपलब्ध होऊ शकणार नाही त्यासाठी राज्य शासनाला परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. अर्थसंकल्पत निधीची तरतूद करण्यात येईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले. तसेच या कामांचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले.
पर्यायी मार्ग उपलब्ध करा
सध्या माणगावातील बायपास तातडीने पूर्ण होणार नाही हे खरे आहे. परंतु, इंदापूर ते कशेणे कालवा रोड पर्यायी मार्ग तसेच माणगाव शहरातील मोर्बा रोड, कालवा मार्ग ते मुंबई गोवा महामार्ग असा पर्यारी मार्ग उपलब्ध करा येऊ शकतो. तसेच साईनगर कालवा मार्ग, भादाव ते विंचवली हा मार्ग झाल्यास कायमस्वरूपी वाहतूक कोंडीतून सुटका होईल. माणगाव शहरातील नगरपंचायत हद्दीत उपकालवा जातो. या कालव्यालगत पाटबंधारे विभागाची जागा आहे. त्या जागेतून रस्ता बनविल्यास वाहतूक कोंडी कमी होईल. या पर्यायी मार्गांसाठी केंद्र सरकारने मदत न केल्यास राज्य सरकारच्या माध्यमातून तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाईल. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तत्काळ पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्या अशा सुचना त्यांनी संबंधित यंत्रणेला यावेळी दिल्या. इंदापूर माणगाव बायपासचे टेंडर निघाले आहे. परंतु, लोणेरे येथील महामार्ग चे काम पूर्ण झाल्याशिवाय बायपासचे काम करणाऱ्या नवीन कंत्राटदाराला वर्क ऑर्डर देता येणार नाही अशी माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी बैठकीत दिली. याबाबत उच्च स्तरावरून प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबई गोवा महामार्ग लगत अनेक छोटी मोठी गावे आहेत. तेथील नागरिक महामार्गावरून प्रवास करीत असतात. त्या नागरिकांना सेवा देणे हे आपले कर्तव्य आहे. जिथे गरज वाटेल तिथे सर्विस रोड बनविले पाहिजेत. कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.
सर्विस रोड बनवत असताना तेथे पाणी साचणार नाही यासाठी बाजूला गटारी सुद्धा बांधली गेली पाहिजे. सर्विस रोड वरून नागरिकांची मोठी वाहने सुद्धा या बाजूकडून त्या बाजूकडे सहजरीत्या गेली पाहिजेत यासाठी योग्य ती उंची राखूनच काम केले गेले पाहिजे. नागरिकांचे हित बघूनच अधिकाऱ्याने काम करावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मुंबई गोवा महामार्गाने प्रवास करणाऱ्या अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात यावे. असे आदेश त्यांनी यावेळी दिले.
खा. सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी या महामार्गाच्या कामाच्या अनुषंगाने सूचना केल्या. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले. या बैठकीला जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
००००