मुंबई, दि.१९:- अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समुपदेशन करून त्यांचे अन्य शाळेत समायोजन करण्यात येते. ज्या शिक्षकांचे अजूनही समायोजन झालेले नाही त्या शिक्षकांसाठी पुन्हा एकदा समुदेशन कार्यक्रम घ्यावा, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर सांगितले.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत राज्यमंत्री श्री. भोयर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
बैठकीस संचालक (माध्यमिक) श्री. पालकर, संचालक (प्राथमिक) श्री. गोसावी, शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी श्री. कंकाळ आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले, मुंबईत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत समायोजन होण्यासाठी महापालिका व शिक्षण विभागाने एकत्रित बैठक घ्यावी. पती – पत्नी शिक्षक समायोजन संदर्भातील प्रकरणे वेगळी कळवावीत.
या बैठकीत शिक्षक संघटनांनी अतिरिक्त शिक्षक समायोजन, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे वेतन यासह शिक्षकांच्या समस्या मांडल्या. शिक्षक संघटनांनी मांडलेल्या शिक्षकांच्या समस्या सकारात्मकतेने सोडवल्या जातील असे, राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.
०००००
एकनाथ पोवार/विसंअ