नवी दिल्ली दि. २१ : माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या ३४ व्या स्मृतीदिनी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ दिनानिमित्त, महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज शपथ घेण्यात आली.
कॉपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात सचिव तथा निवासी आयुक्त आर. विमला यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना, “आम्ही, भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याद्वारे सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करत आहोत. आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करु, तसेच मानवी जिवीत मूल्ये धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करु”अशी शपथ दिली. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार, स्मिता शेलार यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त शपथ
महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करुन अभिवादन केले. उपस्थित कर्मचाऱ्यांना ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ दिनानिमित्त शपथ देण्यात आली.
000
अमरज्योत कौर अरोरा/ वृत्त क्र.114