मुंबई, दि. 21 : पुण्यातील पुरंदर व अहमदनगर येथील कोपरगाव येथे सुसज्ज बहुउद्देशीय तालुका क्रीडा संकुल उभारण्यात यावे, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
पुरंदर तालुका क्रीडा संकुल, कोपरगाव तालुका क्रीडा संकुल उभारणीसंदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार विजय शिवतारे, आमदार आशितोष काळे, अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, उपसचिव श्री. पांढरे, उपसचिव डॉ. सुनिल निमगांवकर, उपसंचालक प्रसाद कर्डिले, उपसचिव निर्मलकुमार चौधरी उपस्थित होते.
मंत्री भरणे म्हणाले की, पुण्यातील पुरंदर तालुक्यात बहुउद्देशीय सभागृह, योगा हॉल, जिम्नॅस्टीक्स, चेंजिंग रूम, बॅडमिन्टन हॉल यासह स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्राचाही समावेश करावा. शासन अनुदान मर्यादेत कामे करावीत व तालुका क्रीडा संकुल समितीने अतिरिक्त निधी स्वबळावर उभारावे.
याचबरोबर कोपरगाव येथे तालुका क्रीडा संकुलात ज्या सुविधा उपलब्ध नाहीत, अशा सुविधांनी परिपूर्ण शहराच्या मध्यभागी असलेल्या क्षेत्रात नव्याने तालुका क्रीडा संकुल उभारण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावा. सद्यस्थितीतील शालेय विद्यार्थ्यांची शहरात संख्या 15 हजारापेक्षा जास्त आहे. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या नव्या क्रीडा संकुलाचा नव क्रीडापट्टू घडविण्यासाठी फायदा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
0000
श्रद्धा मेश्राम/विसंअ/