मुंबई, दि. 21 : अल्पसंख्याक वर्गातील मुलींना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुंबईत अणुशक्तीनगर येथे मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्याचा शासनाचा मानस असल्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम अंतर्गत हे महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
मौजे अनिक, चेंबूर, अणुशक्तीनगर येथे अल्पसंख्याक मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय उभारणे संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सना मलिक, माजी मंत्री नवाब मलिक, अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव रूचेश जैवंशी, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. गोविंद संगवई, सह सचिव संतोष खोरगडे, अवर सचिव मिलिंद शेनॉय, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी आदिसह अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. भरणे म्हणाले की, अल्पसंख्याक वर्गातील विशेषत: मुस्लीम समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शैक्षणिक प्रगतीनेच समाजाची प्रगती साधता येत असल्याने त्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. विशेषत: मुलींना उच्च शिक्षण मिळावे यासाठी अणुशक्ती नगर येथे अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम अंतर्गत हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी नियमानुसार प्रस्ताव सादर करावा. यामध्ये इतर समाजाच्या मुलींनाही प्रवेश घेता यावा, साधनसामग्री, सोयी सुविधा उपलब्ध असाव्यात, त्यादृष्टीने सकारात्मक प्रस्ताव सादर करावा, असेही मंत्री श्री. भरणे यांनी सांगितले.
०००
श्रद्धा मेश्राम/विसंअ/