मुंबई, दि. 21: नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार राज्यातील विद्यापीठे तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिनस्त संवर्गातील प्राध्यापक व अध्यापकांच्या प्रशिक्षणास अधिक महत्त्व दिले आहे. भारतीय मूल्याधिष्ठित शैक्षणिक नेतृत्व घडवण्यासाठी भारतीय ज्ञानपरंपरेचे मूलभूत मूल्य समजून घेऊन शैक्षणिक गुणवत्तावाढ आणि प्राध्यापकांच्या क्षमतेला चालना देण्यासाठीमहाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे आणि श्री. चैतन्य हेल्थ अँड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको व्हीलेज (GEV), पालघर यांच्यामधील करार एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे आणि श्री. चैतन्य हेल्थ अँड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको व्हीलेज (GEV), पालघर यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. राजेंद्र भारुड, व्यवस्थापक (प्रशासन) शंतनु पवार, केंद्र प्रमुख मिथीलेश भाकरे, कार्यकारी सहायक सलीम सय्यद , श्री चैतन्य हेल्थ अँड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको व्हीलेज (GEV), पालघर संस्थेचे नवल जीत कपुर, अनुप गोयल, संजय भोसले उपस्थित होते.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, श्री. चैतन्य हेल्थ अँड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको व्हीलेज (GEV), पालघर ही संस्था भारतीय ज्ञान प्रणाली (Indian Knowledge System – IKS) आणि नेतृत्व विकास या विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते. अशा उपक्रमांमुळे अध्यापकांचे ज्ञान, कौशल्य आणि मूल्याधिष्ठित शैक्षणिक दृष्टिकोन अधिक सुदृढ होईल.
0000
काशीबाई थोरात/विसंअ