मुंबई, दि. 21 : कामगारांचे आरोग्य आणि कल्याण ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी असून रुग्णसेवा योजनांचे प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य कामगार विमा योजनेंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या बैठकीस आमदार मनीषा कायंदे, मुख्य अभियंता लेफ्टनंट कर्नल शिवशंकर मंडल, रिजनल डायरेक्टर श्रीमती अभिलाषा झा, राज्य कामगार विमा योजना प्रशासनाचे संचालक श्री.वायाळ तसेच केंद्र व राज्य शासनातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
अंधेरी (पूर्व) औद्योगिक वसाहतीतील कामगार रुग्णालय तातडीने सुरू करण्यासाठी संबंधित अडचणी सोडवण्याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोल्हापूर येथील राज्य कामगार विमा रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. या निर्णयामुळे स्थानिक कामगारांना त्वरित आरोग्य सुविधा मिळू शकतील. उल्हासनगर येथील शंभर खाटांचे रुग्णालय एक महिन्याच्या आत सुरू करण्यात यावे.
ग्रंथालय कामगार, रेशन दुकानदार यांसारख्या असंघटित कामगार वर्गालाही राज्य कामगार विमा योजनेचे लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात यावे.
राज्यातील कामगार विमा योजनेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लवकरच केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्यात येईल.
येत्या १५ दिवसांत अंधेरी येथे स्थानिक आमदार, उद्योग विभागाचे सचिव व वरिष्ठ अधिकारी यांचे शिष्टमंडळ रुग्णालय स्थळी भेट देऊन अंमलबजावणीबाबत पुढील निर्णय घेईल.
000
संजय ओरके/विसंअ