सातारा दि. 22: पाटण मतदार संघातील रस्ते वन विभागांतर्गत येत आहेत, अशा नवीन रस्त्यांच्या प्रस्तावांना वन विभागाने तातडीने मंजूरी देऊन वन हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाने अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री. देसाई यांनी पाटण मतदार संघातील रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उप वनसंरक्षक आदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
वन विभागातील रस्त्यांचा प्रस्ताव वन विभागाकडे सादर करण्यात आले आहे. या प्रस्तावांना तातडीने मंजुरी द्यावी. संबंधित विभागाने रस्त्यांच्या कामाला मंजूरी मिळाल्यानंतर तातडीने रस्त्यांची कामे सुरु करावीत. नवीन कामांचे प्रस्तावांमध्ये त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रत्येक सोमवारी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेवून पाटण मतदार संघातील विकास कामांचा प्रस्तावांचा आढावा प्रांताधिकारी पाटण यांनी घ्यावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.
नाटोशी उपसा सिंचन योजनेच्या कामाचा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला आढावा
मोरणा (गुरेघर) धरण प्रकल्पातील डावा, उजवा बंदिस्त पाईपलाईन व नाटोशी उपसा सिंचन योजनेच्या सुरु असलेल्या कामाचाही आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. नाटोशी उपसा सिंचन योजनेंतर्गत वाढीव गावांचा प्रस्ताव तातडीने सादर करावा. तसेच मोरणा (गुरेघर) धरण प्रकल्पातील उर्वरित कामांसाठी निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत सांगितले.
0000