मुंबई, दि. २२ : राज्यात गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेत पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले.
मंत्री श्री. जाधव-पाटील म्हणाले, नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्य शासन संवेदनशील आहे. एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेत पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी. यासाठी शेत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. पंचनामे करण्यासाठी महसूल व कृषी विभागाने पथके गठीत करून ही कार्यवाही गतीने पूर्ण करावी.
मंत्री श्री. जाधव – पाटील म्हणाले, अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास शासन नेहमीच प्राधान्य देत आहे. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी सन २०२३- २०२४ या वर्षात ५४ लाख ८० हजार पात्र शेतकऱ्यांना ४ हजार ८३३ कोटी (चार हजार आठशे तेहतीस कोटी ) रूपये तर २०२४- २०२५ या आर्थिक वर्षात ६९ लाख ३ हजार शेतकऱ्यांना ६ हजार ९८९ कोटी ( सहा हजार नऊशे एकोणनव्वद) आणि १ एप्रिल २०२५ ते आतापर्यंत ९ लाख ७ हजार शेतकऱ्यांना ९७५ कोटी रुपयांची मदत देण्यात आली असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले.
००००
एकनाथ पोवार/विसंअ/