विभागीय आयुक्तांचा “वार्ड भेट समस्या समाधान अभियाना”च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद; ७५ नगरपालिकेतून नागरिक सहभागी

नागरिकांच्या अडचणी तत्परतेने सोडवा - विभागीय आयुक्त दिलीप गावडे 

छत्रपती संभाजीनगर, दि.22 एप्रिल, (विमाका) :-पीएम स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना, पाणीपुरवठा तसेच नागरी क्षेत्रातील नागरिकांना येणाऱ्या अडचणीबाबत आज नागरिकांनी थेट विभागीय आयुक्तांशी संवाद साधला. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी नागरिकांनी मांडलेल्या अडचणी तत्परतेने सोडवा, असे निर्देश यंत्रणेला दिले. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मिळाल्याचा आनंद अनेक लाभार्थ्यांनी व्यक्त केला.

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे थेट संवाद साधण्यासाठीचा उपक्रम हाती घेतला आहे. नगरपालिका क्षेत्रात वार्ड भेट समस्या समाधान अभियाना”च्या माध्यमातून आज संवाद साधला. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातून अपर आयुक्त विजयसिंह देशमुख, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, सह आयुक्त देविदास टेकाळे, सहायक आयुक्त संजय केदार उपस्थित होते.

नगरविकास विभागाच्या योजना, अडचणी, योजनेच्या अंमलबजावणीचे धोरण तसेच प्रभागातील अडचणीबाबत नागरिकांनी संवाद साधला. नगरपालिका क्षेत्रातील अनेक लाभार्थी नागरिकांनी प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, पीएम स्वनिधी अंतर्गत पहिले कर्ज मिळाले मात्र दुसऱ्या हफ्त्याचे कर्ज मिळाले नाही तसेच 50 हजारानंतर कर्जाची मर्यादा वाढवावी, अशी मागणी बहुतांश लाभार्थ्यांनी केली आहे. याबाबतचा परिपुर्ण मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याबाबत विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी निर्देश दिले.

धाराशिव जिल्हयातील उमरगा येथे शहरात पंधरा दिवसाला पाणीपुरवठा होत असल्याचे महिलांनी सांगितले, त्यावर स्थानिक प्रशासनाने पाणीपुरवठ्याबाबत योग्य नियोजन करून पाणीपुरवठयातील अंतर कमी करावे व पाणीपुरवठा योजना गतीने पुर्ण करावी. तसेच पावसाळयाच्या अनुषंगाने स्वच्छ पाणीपुरठयाबाबत सर्वच नगरपालिका प्रशासनाने काळजी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.

गंगाखेड परिषदेअंतर्गत येत असलेल्या लाभार्थ्यानी पीएम विश्वकर्मा योजनेबाबत झालेल्या लाभाची माहिती दिली. धाराशिव नगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेची 95 टक्के काम पुर्ण झाल्याचे सांगण्यात आले असून याबाबत विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी समाधान व्यक्त केले.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील नागरी क्षेत्रातील महिलांनी पीएम स्वनिधी पोर्टल कधी सुरू होणार तसेच याबाबत कर्जाची मर्यादा वाढवावी, अशी मागणी केली, त्यावर प्रस्ताव पाठवा, धोरणात्मक निर्णयासाठी शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सह आयुक्त श्री टकाळे यांनी सांगितले.

मराठवाड्यातील नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी ऐवढ्या मोठ्या संख्येत शांततेत व शिस्तबद्ध पध्दतीने सहभाग नोंदविल्याबद्दल विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी नागरिकांचे आभार मानले. तसेच ज्या नगर पालिका क्षेत्रातील नागरिकांशी आज संवाद होऊ शकला नाही त्यांच्याशी येत्या 15 दिवसात संवाद साधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी विभागातील आठही जिल्हयातील बहुतांश नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी संवादात सहभाग घेतला. यावेळी जिल्हा निहाय नगरपालिकांच्या कार्याचाही आढावा घेण्यात आला.

००००००