दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती  प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन 

कोल्हापूर, दि.23 (जिमाका): बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना (मौनीनगर) येथील इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली फित कापून व कोनशिलेचे अनावरण करुन संपन्न झाले.

यावेळी आमदार सतेज पाटील, माजी आमदार बजरंगआण्णा देसाई, माजी आमदार संजयबाबा घाटगे, कारखान्याचे चेअरमन माजी आमदार के. पी. पाटील, व्हाईस चेअरमन मनोज फराकटे, सर्व संचालक मंडळ ,प्रादेशिक साखर सहसंचालक जी. जी. मावळे, कार्यकारी संचालक के. एस. चौगुले, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, गोकूळचे संचालक युवराज पाटील, अंबरिष घाटगे, शशिकांत पाटील-चुयेकर, प्रा. किसन चौगले, केडीसीसीचे संचालक भैय्या माने यांच्यासह कारखाना कार्यक्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद, कर्मचारी उपस्थित होते.

भारताच्या इथेनॉल धोरणाने उसाचा रस आणि मोलॅसेसपासून इथेनॉलच्या उत्पादनाला प्रोत्साहन देऊन साखर उद्योगाचा कायापालट केला आहे. देशांतर्गत इथेनॉलचे उत्पादन करुन, भारताने आयातित कच्च्या तेलावरील आपले अवलंबित्व कमी केले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर परकीय चलनाची बचत झाली आहे. इथेनॉल हे पेट्रोलच्या तुलनेत स्वच्छ इंधन आहे, ज्यामुळे हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी होते. ऊस शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी हमीभावाची बाजारपेठ उपलब्ध आहे, ज्यामुळे उत्पन्न स्थिरता येते आणि वेळेवर पैसेही मिळतात.

बिद्री कारखान्याच्या सन २०१७ – १८ च्या वार्षिक सभेत प्रतिदिन ६० हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प उभारण्यास सभासदांनी मंजुरी दिली आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतल्यानंतर सुमारे १३८ कोटी रुपये खर्चून अद्ययावत इथेनॉल प्रकल्प कारखाना कार्यस्थळावर साकारण्यात आला आहे. या प्रकल्पातून प्रत्यक्ष उत्पादन सुरु झाले असून प्रकल्पाचा गतवर्षी चाचणी हंगाम यशस्वी पार पडला आहे.

साखर कारखान्यात इथेनॉल तयार केल्याने मोलॅसेसचा योग्य वापर, आर्थिक लाभ, पर्यावरण संरक्षण आणि शेतकऱ्यांचा फायदा असा चौफेर उपयोग होतो. यासाठीच या साखर कारखान्यात इथेनॉल निर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन माजी आमदार के. पी. पाटील यांनी दिली.

*****