कोल्हापूर, दि.26, (जिमाका): सातारा – कागल महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.
सातारा – कागल हायवे एनएच 48 (जुना एनएच 4) रोडवरील उड्डाणपूल, सातारा -कागल महामार्गाचे काम, या महामार्गादरम्यान सांगली फाटा ते उचगाव मार्गावर होणाऱ्या उड्डाणपुलाचा डीपीआर, तसेच तावडे हॉटेल ते सीपीआर चौक ते गगनबावडा रोड/ रत्नागिरी रोड (शिवाजी पूल) बाबत (कोल्हापूर इंटरनल सिटी इलेव्हेटेड फ्लाय ओव्हर) चे सादरीकरण आदी विषयांबाबत मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री प्रकाश आबिटकर (दूरदृश्यप्रणालीद्वारे) यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठका घेण्यात आल्या. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, राष्ट्रीय महामार्गा प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (राष्ट्रीय महामार्ग) कार्यकारी अभियंता पी. एस. महाजन, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे तसेच संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग व उड्डाणपुलांशी संबंधित डीपीआरचे सादरीकरण संजय कदम यांनी केले. या प्रकल्पांच्या सद्यस्थितीची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सातारा – कागल महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरु असल्यामुळे या मार्गावरील प्रवासास खूप वेळ लागत आहे. या महामार्गाच्या कामाला विलंब केल्याबद्दल संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावून त्याच्यावर कारवाई करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील महामार्गांचे काम जलद गतीने पूर्ण करा. उड्डाणपूलांचे डीपीआर अंतिम करुन लवकरात लवकर केंद्र सरकारकडे सादर करा.
मध्यवर्ती बसस्थानकाजवळ असणाऱ्या परीख पुल परिसरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी हा पूल शहरातून जाणाऱ्या मुख्य उड्डाण पुलाला जोडता येईल का, या दृष्टीने त्याची पाहणी करण्याच्या सूचना कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केल्या. तसेच सध्या पावसामुळे धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असूनही शहरात पिण्याच्या पाण्याचा अपुरा पुरवठा होत आहे. पाणी पुरवठा सुरळीत व्हावा, असेही त्यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या सूचनांचा विचार करुन लवकरात लवकर नव्या आराखड्यावर बैठक घ्यावी, अशा सूचना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी केली.
स्टार बाजार समोर टेंबलाईवाडी (रेल्वे ट्रॅक वरील)उड्डाणपूल पाडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुधारित स्वरुपात नव्याने उड्डाणपूल उभारण्याच्या सूचना आमदार अमल महाडिक यांनी केल्या. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत 10 जून 2025 रोजी बैठक नियोजित असून याविषयीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच शहर परिसरात पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊ नयेत, यासाठी महानगरपालिकेने लवकरात लवकर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
सातारा – कागल हायवे एनएच 48 (जुना एनएच 4) रोडवर कागल शहरासाठी उड्डाणपूल होण्याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनी सूचना केली होती, त्यानुसार आराखडा (डीपीआर) तयार करण्यात आला असून त्याचे व सातारा – कागल महामार्गादरम्यान सांगली फाटा ते उंचगाव मार्गावर होणाऱ्या उड्डाणपुलाच्या डीपीआरचे तसेच शहराच्या प्रवेश मार्गावर पंचगंगा पुलानजीकच्या प्रस्तावित बास्केट ब्रिजचे सादरीकरणही बैठकीत करण्यात आले. शिवाजी पूल ते केर्ली दरम्यानचा रस्ता पुरामुळे पाण्याखाली जातो. या मार्गावर पाण्याचा निचरा होणाऱ्या उपाययोजना करून नव्याने करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या आराखड्याचे सादरीकरणही बैठकीत करण्यात आले.
0000