अहिल्यानगर, दि.२७ – अविरत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अहिल्यानगर तालुक्यातील खडकी व वाळकी गावामध्ये गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गावामध्ये पाण्याची पातळी कमरेपर्यंत पोहोचली असून, रहिवासी अडकून पडले आहेत. हे गाव सैन्याच्या आर्मर्ड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल (ACC&S) पासून सुमारे २० किमी अंतरावर आहे. याठिकाणी लष्कराच्यावतीने मदतकार्य राबविण्यात येत आहे. यात खडकी येथून १० व वाळकी येथून १५ जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडून मदतीची विनंती प्राप्त झाल्यानंतर भारतीय सैन्याने तात्काळ ACC&S येथून एक मदत पथक तैनात करून बचाव व मदत कार्य सुरू केले.
हे मदत पथक संध्याकाळी १७:३५ वाजता अरंगगाव येथे पोहोचले आणि तेथील नागरी प्रशासनासोबत समन्वय साधून पुरग्रस्त भागाकडे रवाना झाले. १७:५० वाजता पथक खडकीनगर गावात दाखल झाले आणि तातडीने बचावकार्य सुरू केले आहे, अशी प्राथमिक माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त झाली आहे.
000