महाराष्ट्रातील सहा मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली, 27 :  विविध क्षेत्रांमध्ये  अतुलनीय काम करणा-या  68 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते  देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या पद्म पुरस्कारां’ ने सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील  सहा मान्यवरांचा  समावेश आहे.

राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती यांच्या हस्ते दुस-या  व अंतिम टप्यात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखडप्रधानमंत्री नरेंद्र मोदीकेंद्रीय गृहमंत्री अमित शाहतसेच अन्य केंद्रीय मंत्रीगण  व केंद्र शासनातील  वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या पुरस्कार समारंभात राज्यातील सहा  मान्यवरांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी लोकसभा अध्यक्ष डॉ .मनोहर जोशी  यांना सार्वजनिक क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कार’ (मरणोत्तर) तर  अशोक सराफअच्युत पालव अश्विनी भिडे-देशपांडे यांना कला क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी तसेच कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी सुभाष शर्मा व वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी डॉ. विलास डांगरे यांना  पद्मश्री पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

डॉ. मनोहर जोशी यांना पद्मभूषण (मरणोत्तर) पुरस्कार प्रदान

राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी लोकसभा अध्यक्ष डॉ. मनोहर जोशी  यांना सार्वजनिक क्षेत्रात  अमूल्य योगदानासाठी  पद्मभूषण’ (मरणोत्तर) पुरस्कारने गौरविण्यात आले. हा पुरस्कार त्यांचे सुपुत्र श्री. उन्मेश जोशी यांनी स्विकारला. डॉ. जोशी यांनी पाच दशकाच्या राजकीय कारकिर्दीत मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकमहापौरआमदारमुख्यमंत्रीकेंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या. सन 1995 मध्ये ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2002 ते 2004 या कालखंडात त्यांनी लोकसभा अध्यक्षपद भूषवले. रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी जन्मलेल्या जोशी यांनी शिक्षणशिस्तआणि कार्यक्षम नेतृत्वाने  आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.

पाच मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान

अशोक सराफ :

मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनयाचे सम्राटज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना त्यांच्या कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार  प्रदान करण्यात आला. अभिनयातील सहजताटायमिंग आणि विविध भावछटांचे सशक्त सादरीकरण या बाबींसाठी त्यांना हा सन्मान मिळाला. अशोक सराफ यांचे अशी ही बनवाबनवी‘, ‘धुमधडाका‘, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी‘ आणि पंढरीची वारी‘ यासारखे अनेक चित्रपट रसिकांच्या हृदयात कायमचे घर करून आहेत.अशोक सराफ यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांनी देखील केले होते. एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान दिलीप कुमार यांनी सराफ यांना त्यांच्या अभिनयाच्या टायमिंगसाठी शाबासकी दिली होती. श्री. सराफ यांचा अभिनय जीवनभर अविस्मरणीय ठरला आहे. अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपार यश मिळवले असूनतो आजही मराठी रसिकांचा आवडता चित्रपट आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्येदेखील अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

अच्युत पालव :

देवनागरी लिपीच्या कलेला नवसंजीवनी देणारे प्रसिद्ध कॅलिग्राफर अच्युत पालव यांना कला क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सर्जनशीलतेतून देवनागरी लिपीचे सौंदर्य आणि शिस्तबद्धता प्रभावीपणे समोर येते.अच्युत पालव यांची कला शैली ही पारंपरिकतेचा गाभा राखत आधुनिकतेशी सुसंगत अशी असूनते अक्षरांना विशिष्ट आकारसंतुलन आणि कलात्मक स्पर्श देतात. त्यांच्या लेखनातून केवळ पठनीयता जपली जात नाहीतर सौंदर्यदृष्ट्याही ते अक्षरांना एक नवे आयाम मिळवून देतात. ते फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही देवनागरी लिपीचा प्रचार व प्रसार करतात. त्यांनी विविध देशांमध्ये कार्यशाळाप्रदर्शने आणि सेमिनार्सद्वारे देवनागरी लिपीची कला आणि तिची वैशिष्ट्ये प्रभावीपणे मांडली आहेत. यासोबतत्यांच्या प्रकाशित पुस्तकांमुळे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यांमुळे नागरी लिपीला एक स्वतंत्र कला म्हणून प्रतिष्ठा लाभली आहे.

अश्विनी भिडे-देशपांडे :

जयपुर-अतत्रौली घराण्याच्या ख्याल गायकी परंपरेतील आघाडीच्या गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांना शास्त्रीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बालपणापासून संगीताची गोडी असलेल्या अश्विनी यांनी “गांधर्व महाविद्यालयातून “संगीत विशारद” पदवी प्राप्त केली. पं. नारायणराव दातार आणि आई माणिक भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जयपूर घराण्याची सखोल साधना केली.त्यांच्या गायकीत रागांची सौंदर्यपूर्ण मांडणीभावाभिव्यक्ती आणि लयकारी यांचे अद्वितीय समन्वय आढळतो. त्यांनी शास्त्रीय गायनाबरोबर ठुमरीभजनअभंग यातही निपुणता साधली आहे. एचएमवीसह अनेक नामवंत संगीत कंपन्यांमार्फत त्यांचे अल्बम प्रकाशित झाले आहेत. “राष्ट्रीय कालिदास सन्मान”(2016), “संगीत नाटक अकादमी पुरस्कार”(2015), “राष्ट्रीय कुमार गंधर्व सन्मान” (2005) यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. आजही त्या आपल्या गायनअध्यापन व कार्यशाळांद्वारे ख्याल गायकीची परंपरा समृद्ध करत आहेत.

सुभाष शर्मा :

यवतमाळ जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी सुभाष शर्मा यांना कृषी क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. नैसर्गिक शेतीच्या विविध पद्धतींचा अवलंब करून त्यांनी हजारो शेतकऱ्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन देत आहेत. सुभाष शर्मा यांचे वडील खेतूलाल यांच्या 16 एकर शेतीची जबाबदारी त्यांच्या निधनानंतर  त्‍यांच्यावर आली. मात्र, 2011 मध्ये त्यांनी वडिलोपार्जित शेती विकून तिवसा शिवारात त्यांनी 16 एकर जमीन खरेदी केली. नव्या जमिनीवर त्यांनी नैसर्गिक शेतीचे प्रयोग सुरू केले. मातीची सुपीकता राखण्याचे तंत्रपिकांचे नियोजन आणि पर्यावरणपूरक पद्धती यामुळे त्यांची शेती देशभरातील शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरली. सततच्या प्रयोगशीलतेने आणि जिद्दीने त्यांनी शेतीत नवदृष्टी निर्माण केली. त्यांचा संघर्षनवनिर्मितीचा दृष्टिकोन आणि कृषी क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना पद्मश्री या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले आहे.

डॉ. विलास डांगरे :

70 वर्षीय डॉ. विलास डांगरे यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. होमिओपॅथीच्या माध्यमातून त्यांनी गरजूंच्या आरोग्यसेवेत अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांच्या नाडी परीक्षण कौशल्यामुळे ते एक सुप्रसिद्ध होमिओपॅथी चिकित्सक म्हणून ओळखले जातात. खास करून 2014 मध्ये नागपूरच्या कस्तूरचंद पार्कमध्ये झालेल्या रॅलीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घश्याला त्रास झाला होतातेव्हा डॉ. डांगरे यांनी केलेल्या उपचारामुळे त्यांना आराम पडला होता. नागपूरमधील त्यांचे क्लिनिक गरजू रुग्णांसाठी आश्रयस्थान ठरले असून त्यांनी आतापर्यंत एक लाखाहून अधिक रुग्णांना उपचार दिले आहेत. 10 वर्षा पासून ते दिव्यांग-दृष्टीहीन झाले आहेत. तथापित्यावरही मात करत ते आपली  अमूल्य  सेवा रुग्णांना देत आहेत. 

यंदाच्या पद्म पुरस्कार वितरणाची प्रक्रिया दोन टप्प्यात झाली. पहिल्या टप्पयात  71 जणांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले, यामध्ये मध्ये 4 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 57 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. आज उर्वरित 68 पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये 3  पद्मविभूषण, 09 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे  यंदाच्या पुरस्कार यादीत एकूण 139 मान्यवरांची  निवड करण्यात आली होती. त्यात 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

000000

अमरज्योत कौर अरोरा/ वृत्त विशेष  –118