जळगाव जिल्ह्यातील पाच तालुके डी+ करण्यास तत्वतः मंजुरी – उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २८ : जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी १० तालुक्याचे वर्गीकरण होऊन ते डी+ वर्गवारीत झाले. पुढील एक महिन्यात नवीन औद्योगिक धोरण जाहीर होणार असून या धोरणात जळगाव जिल्ह्यातील शिल्लक पाच तालुक्यांचा समावेश डी+ वर्गवारीत करण्यात येईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आजच्या बैठकीत दिली.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यातील आमदार, लोकप्रतिनिधी आणि शिष्टमंडळांनी उद्योगमंत्री श्री.सामंत यांची भेट घेतली. याप्रसंगी जळगाव जिल्ह्याच्या पाच तालुक्यांचा समावेश डी+ वर्गवारीत होणार असल्याची तत्वतः मान्यता उद्योगमंत्री यांनी दिली. बैठकीस एम. आय. डी. सी. चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, विकास आयुक्त दीपेंद्रसिंग कुशवाह, सहसचिव श्रीकांत पुलकुंडवार तसेच जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उद्योग मंत्री श्री. सामंत म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात उद्योग आले पाहिजेत, यासाठी उद्योजकांशी बोलून त्यांना जळगाव जिल्ह्यात उद्योग उभारण्याबाबत विनंती करण्यात येईल. यासाठी लोकप्रतिनिधींनी सुद्धा प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. जळगाव जिल्ह्यात मेगा प्रकल्प किंवा अल्ट्रा मेगा प्रकल्प आल्यास प्रस्तावित औद्योगिक धोरणानुसार सवलतीचा लाभ मिळतो. त्याचप्रमाणे ५०० कोटी पेक्षा कमी गुंतवणूक असलेल्या उद्योगांना सुद्धा एमएसएमई अंतर्गत लाभ देण्यात येत असल्याचे मंत्री श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत उद्योगमंत्री श्री.सामंत यांनी सांगितले की, डिफेन्स उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची गरज लागते. डिफेन्स उद्योगास जागा उपलब्ध करून दिल्यास त्याचा मोठा फायदा जळगाव जिल्ह्यास होऊ शकतो, असेही मंत्री श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

000

संजय ओरके/विसंअ/