मुंबई दि. २८ : पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सुरक्षा दल हा पर्यटन विभागाकडून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. महाबळेश्वर येथील पर्यटन महोत्सवात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून या उपक्रमाचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
या संदर्भात मंत्री श्री. देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली. बैठकीस आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार महेंद्र थोरवे, पर्यटन संचालक श्री. पाटील यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. देसाई म्हणाले, पर्यटन सुरक्षा दलासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडील अधिकारी- कर्मचारी यांची सेवा घेण्यात येत आहे. सुरवातीच्या टप्प्यात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, कास पठार, पाचगणी आणि कोयनानगर येथे हा उपक्रम राबविण्यात येईल. या उपक्रमांतर्गत नियुक्त अधिकाऱ्यांसाठी वाहने घेण्यात यावीत. याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
तत्पूर्वी मंत्री श्री. देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील कोयनानगर नेहरू गार्डन, स्काय वॉक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण आणि नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे विकसित करण्यात येणाऱ्या पर्यटन प्रकल्पासंदर्भात माहिती घेतली. हे प्रकल्प केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी विहित निकषानुसार तयार करून पाठवावेत आशा सूचनाही त्यांनी दिल्या.
००००
एकनाथ पोवार/विसंअ/