‘भाषिणी’ उपयोजकासाठी भाषिक डेटा संकलनाची गरज – सचिव किरण कुलकर्णी

मुंबई, दि. 28 :- भाषिणी उपयोजक (भाषिणी अ‍ॅप्लिकेशन) अधिकाधिक प्रगत, सक्षम आणि उपयोगी व्हावे यासाठी भाषिक डेटाचे व्यापक स्तरावर संकलन करणे अत्यावश्यक आहे. या डाटा संकलनासाठी सर्व विभागांनी सामुहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांनी सांगितले.

मराठी भाषा विभाग आणि केंद्र सरकारच्या भाषिणी टीम यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयात ‘भाषिणी’ उपयोजकांच्या वापराच्या अनुषंगाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सह सचिव डॉ. नामदेव भोसले, डिजिटल इंडिया भाषिणी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग, प्रा. मितेश खापरा,  मराठी भाषा विभागातील तसेच मंत्रालयातील इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सचिव श्री. कुलकर्णी म्हणाले, मराठी भाषेचा प्रचार-प्रसार आणि मराठी भाषेचे व्यापक स्तरावर सुलभीकरण करणे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भाषिणी उपयोजकासाठी आवश्यक असलेला डाटा संकलित करण्यासाठी सर्व मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या कामकाजामध्ये वापरले जाणारे शब्द व संज्ञा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी एक व्यापक मोहीम राबविणे आवश्यक असून, राज्यातील विविध प्रशासकीय कार्यालयांमध्ये नियुक्त केलेल्या मराठी भाषा अधिकाऱ्यांचे देखील या कामासाठी सहकार्य घेता येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

भारत सरकारने भाषिणी उपयोजक (भाषिणी अॅप्लीकेशन) हा एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. भाषिणी अॅप्लीकेशन हे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि नैसर्गिक भाषा प्रक्रियेवर (एनएलपी) आधारित प्लॅटफॉर्म आहे, जे ए.आय. आणि एन.एल. पी. चा वापर करून भारतीय भाषा डिजिटल आणि तांत्रिक सेवांमध्ये अधिक प्रवेशयोग्य बनवण्याचा प्रयत्न करते. तसेच भारतीय अधिकृत भाषांमध्ये सेवा देते. डिजिटल सेवा भारतीय भाषांमध्ये सहज उपलब्ध करून देणे. भारतातील विविध भाषांमध्ये भाषांतर आणि संवाद साधने सुलभ करणे हा यामागचा हेतू आहे.

या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून असलेले श्री. नाग आणि श्री. खापरा यांचे भाषिणी उत्पादने आणि त्यांचा वापर व डेटासेटची भूमिका आणि अधिक सुधारित भाषिक एआय मॉडेल विकसित करण्यासाठी प्रादेशिक योगदानाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन झाले. यावेळी श्री. नाग यांनी मराठी भाषा विभागामार्फत हॅकॅथॉन स्पर्धा राबविण्यात येईल असे सांगितले.

या कार्यशाळेत महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेकडून करण्यात आलेल्या कामाची दृकश्राव्य चित्रफीत दाखवण्यात आली.

०००

शैलजा पाटील/विसंअ