इजिप्त सोबत सौहार्दाचे संबंध वाढविण्यास महाराष्ट्र उत्सुक – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. २८ : इजिप्त सोबत महाराष्ट्राचे अनेक दशकांपासूनचे सौहार्दाचे संबंध असून महाराष्ट्र हे संबंध वृद्धिंगत करण्यास उत्सुक असल्याचे प्रतिपादन राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

इजिप्तच्या महावाणिज्यदूत दाहिला तावाकोल यांनी राजशिष्टाचार मंत्री श्री. रावल यांची भेट घेतली. पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यावेळी उपस्थित होते.

राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणाले, महाराष्ट्र हे भारताचे शक्ती केंद्र असून भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था होण्यामध्ये महाराष्ट्राचा मोठा सहभाग आहे. राज्यात कृषी उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्याअनुषंगाने येथे अन्न प्रक्रिया उद्योगांना मोठी संधी आहे. इजिप्तमधील उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी पुढे आल्यास त्यांचे येथे स्वागत होईल. राज्यात पर्यटकांना आकर्षित करणारी सर्व प्रकारची पर्यटन स्थळे असून पर्यटक सुरक्षित पर्यटनाला अधिक महत्त्व देत असल्याने महाराष्ट्राला अधिक पसंती मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

इजिप्तच्या महावाणिज्यदूत दाहिला तावाकोल यांनी इजिप्तविषयी माहिती देऊन महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात चांगली कामगिरी करीत असल्याबद्दल महाराष्ट्राचे कौतुक केले. इजिप्त आणि महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या आणि व्यापाराच्या संधींचा अभ्यास करण्यासाठी इजिप्तचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ राज्यात येऊ इच्छित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

००००

बी.सी.झंवर/विसंअ/