मौजे दिघी कोळीवाडा येथील मच्छिमार जेट्टीचे बांधकाम गुणवत्तेसह कालमर्यादेत पूर्ण करा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 28 : रायगड, मौजे दिघी कोळीवाडा येथील मच्छिमार जेट्टीचे बांधकाम उत्तम दर्जाचे आणि कालबद्ध पद्धतीत पूर्ण करावे. मासळी उतरविण्याच्या ठिकाणी मच्छिमारांना मुलभूत सुविधा पुरविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

श्रीवर्धन येथील मच्छिमार जेट्टीच्या बांधकाम कामाच्या आढावा संदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले हेाते. यावेळी मंत्री तटकरे बोलत होत्या. यावेळी खासदार सुनिल तटकरे यांच्यासह मौजे दिघी कोळीवाडा, मुळगाव, भरडकोल, जीवनेश्वर येथील कोळीबांधव  उपस्थित होते.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, या बांधकामामध्ये त्रुटी आढळून आल्याचे निदर्शनास आले असून, त्यावर तत्काळ कार्यवाही करावी. नव्याने बांधकाम करावे अथवा डागडुजी करावी. उर्वरित काम चांगल्या गुणवत्तेचे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावे. त्याचप्रमाणे प्रलंबित डिझेल परतावा लवकरात लवकर मिळावा अशा सुचना दिल्या. तसेच, जेट्टीअंतर्गत आईस फॅक्ट्री, कोल्ड स्टोरेज, पंपटाकी, उर्वरित जागेचा योग्य वापर करण्याची तरतुदीसह मच्छीमारांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे त्यांनी सांगितले.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/