जिल्हा वार्षिक योजनेच्या २०२४-२५ च्या खर्चास मान्यता
हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2024-25 च्या खर्चास पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज मान्यता दिली. तसेच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2025-26 साठीच्या 311 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, 30 जानेवारी 2025 च्या बैठकीतील इतिवृताच्या अनुपालनासही मान्यता देण्यात आल्याचे पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीला खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार तानाजीराव मुटकुळे, आमदार राजुभैय्या उर्फ चंद्रकांत नवघरे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. जी. पोत्रे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त यादव गायकवाड, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी सुनिल बारसे यांच्यासह सर्व कार्यान्वयीन यंत्रणेच्या प्रमुखांची उपस्थिती होती.
जिल्ह्याच्या विकासात सर्वसामान्य केंद्रीत योजनांना महत्त्वाचे स्थान देण्यात येणार असून, शिक्षण, आरोग्य, वीज, पर्यटन, कृषि, सिंचन यासह विविध क्षेत्रांचा विकास करण्यासाठी प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी दिले. जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात येईल. जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे बांधकाम करताना प्राथमिकता ठरवून ते टप्प्याटप्प्याने सुरु करावे. जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातील विकास कामे करताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचीही अंमलबजावणी करावी. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान अनुदानाची रक्कम ईकेवायसी न झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया वेगाने पार पाडण्याचे निर्देशही पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले. वळवाच्या पावसामुळे जिल्ह्यातील घरकुल आणि हळद, केळी आणि भुईमूग पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोबतच वीज पडून झालेली जीवित व वित्तहानी झाली आहे. कृषि व महसूल विभागाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिर बळसोंड, श्री जगदंबा देवी मंदिर देवस्थान दरेगाव तसेच इतर तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांचे श्रेणीवर्धन करण्यासाठीचे प्रस्ताव व कार्यवाही करण्याच्या त्यांनी सूचना केल्या. जिल्ह्यातील अपघातप्रवण रस्त्यांची तपासणी करून त्यांना ब्लॅकस्पॉट घोषित करण्याची कार्यवाही आरटीओंनी पूर्ण करावी. जलसंधारण विभागाने जिल्ह्यातील सर्व तलावांची पाहणी व सर्वे करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा. चिरागशहा, नागेशवाडी, गवळेवाडी, सारंगवाडी तलावांच्या दुरुस्ती, डागडुजीची कामे तात्काळ सुरु करून पावसाळ्यात होणारी जीवित किंवा वित्तहानी होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या. तसेच आवश्यक तिथे वनविभागाने त्यांच्या कार्यक्षेत्रात नियमानुसार छोटे पाझर तलाव बांधणी करून पावसाचे पाणी अडविण्यासाठी कामे हाती घ्यावीत,असेही पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, जिल्ह्यातील विविध गावांमध्ये आदर्श शाळा विकसित करा. तेथील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शालेय, क्रीडा साहित्य, पाठ्यपुस्तके खरेदी करा. तसेच शाळा, वाड्या तपासून घ्या. या निधीतून चांगली क्रीडांगणे तयार करून भावी खेळाडू घडवण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या. डोंगरी विकास योजनेतून डोंगरी भागातील अंगणवाड्यांचे बांधकाम करण्याचे निर्देश दिले.
शाळा आणि शहरातील विविध भागात सीसीटीव्ही बसवावेत. पावसाळ्यापूर्वी ग्रामीण रस्त्याची कामे पूर्ण करावीत. आरोग्य विभागामार्फत सामान्य नागरिकांला आरोग्य सेवा मिळण्यासाठी आरोग्य विभागाने सर्व पायाभूत सोयीसुविधा निर्माण कराव्यात. यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल,असे पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आरोग्य विभाग, महावितरण विभाग, शालेय शिक्षण विभाग, जलसंधारण, तीर्थस्थळ, पर्यटन स्थळ यासाठी उपलब्ध निधीचे योग्य नियोजन करुन सदर निधी लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी वेळेत खर्च करावा. तसेच सन 2024-25 आराखड्यातील 277 कोटींची तरतूद प्राप्त झाली होती. त्याचे सर्व विभागांना वितरण करण्यात आले व विविध कामांवर सर्व 272 कोटी खर्च करण्यात आला. सर्व संबंधित विभागांनी सन 2025-26 अंतर्गत 311 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, अनुसूचित उपयोजनेत 54 कोटी तर आदिवासी उपयोजनेत 24 कोटी 74 लाख 89 हजार नियतव्यय मंजूर आहे. या सर्व निधीसाठीचे प्रस्ताव वेळेत तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी संबंधितांना दिले.
यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी विभागनिहाय आढावा घेताना मृदा व जलसंधारण, वन विभाग, कृषि, पर्यटन, क्रीडा विभाग, जिल्हा ग्रंथालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, कौशल्य विकास विभाग, आदिवासी विकास विभाग, महावितरण, पोलीस प्रशासन, पाणीपुरवठा विभाग यासह सर्व विभागांचा आढावा घेतला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी तसेच पशुसंवर्धन विभागासाठी औषध खरेदी करण्याबाबत निर्देश देण्यात आले. तसेच नाविन्यपूर्ण योजनांमध्ये करण्यात येणाऱ्या कामांचाही आढावा घेतला. तसेच यावेळी जिल्हा अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेच्या खर्चाचाही आढावा घेण्यात आला.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सूचना व मागण्यांच्या अनुषंगाने सर्व संबंधित शासकीय यंत्रणेने तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सादरीकरणाद्वारे जिल्हा विकास आराखड्यानुसार कृषि, सिंचन, फळबाग लागवड, हळद लागवड, उद्योग व स्वयंरोजगार, पर्यटन यासह विविध विषयावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती दिली.
गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पडत असलेल्या वळवाच्या पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये. पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नये. बोगस खते व बियाण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी व जिल्हा प्रशासनाने नियंत्रण पथकामार्फत बारकाईने लक्ष ठेवावेत. दैनंदिन पर्जन्यमानाविषयीची माहिती नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचवावी. पावसाळ्यात आरोग्य यंत्रणेने मुख्यालयी राहून तात्काळ आरोग्य सेवा पुरवाव्यात. महसूल विभागाने विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे वेळेत उपलब्ध करुन द्यावेत. शेतकऱ्यांना बँकांनी वेळेत आणि सहज व सुलभ पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावेत, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी बैठकीत दिल्या.