मुंबई, दि 28 – छत्रपती संभाजीनगर शहराची पाणी पुरवठा योजना सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून ऑक्टोबर अखेरपर्यंत कार्यान्वीत करा. तसेच सर्व प्रलंबित कामे तातडीने मार्गी लागण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे छत्रपती संभाजीनगर पाणी पुरवठा योजनेसंदर्भात आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
पाणी पुरवठ्यासाठी जॅकवेल महत्वाचे असून त्याचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून पाणी उपसा सुरू करण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या योजनेतील २६ एम एल डी पाणी पुरवठा करणारा टप्पा जून अखेरपर्यंत पूर्ण करावा. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अपूर्ण कामे लवकर होण्याच्या दृष्टीने तातडीने मान्यता द्यावी. पाईप लाइन टाकण्याच्या कामासाठी महानगरपालिकेने १५ जूननंतर शटडाउन घ्यावा. ठेकेदारांनी ती कामे ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण करावी. ‘आरओडब्लू’चे काम एक आठवड्यात मार्गी लावावे, ठेकेदाराने किमान 35 ईएसआर आणि जीएसआर पूर्ण करून द्याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ठेकेदारांना काम करताना येणाऱ्या अडचणी महानगरपालिका आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून सोडवाव्यात आणि ठेकेदारांनीही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाचे नियोजन करावे. या योजनेतील पाणी पुरवठ्याच्या टाक्या तातडीने कार्यान्वीत करण्यासाठी नियोजन करावे. ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत पाणी टाक्यांची कामे पूर्ण करावीत. यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महानगरपालिकेनी समन्वयाने काम करावे. कामामध्ये खंड पडू नये यासाठी महानगरपालिकेला ८२२ कोटी रुपयांचा कर्ज निधी उभारण्याची मंजुरी तातडीने द्यावी. तसेच याच्या व्याजामध्ये असलेला जास्तीचा दर फरक शासन स्तरावरून भरून द्यावा. पाणी पुरवठ्याचे हायड्रॉलिक टॅप कार्यान्वित करावे आणि त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारावर असावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण न केल्यास त्याला काळ्या यादीत टाकण्यात येईल. पोलिस, महानगरपालिका आणि जीवन प्राधिकरण यांनी समन्वयाने काम करून ही योजना वेळेत पूर्ण करावी. पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्यांची कामे तातडीने पूर्ण करावे.
यावेळी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
00000
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ