नंदुरबार जिल्ह्यातील भरोसा सेल आणि दामिनी पथकांची कामगिरी उत्तम – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर

बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी

नंदुरबार, दिनांक 04 जुलै, 2025 (जिमाका) : जिल्हा पोलीस यंत्रणेमार्फत जिल्ह्यात भरोसा सेल आणि दामिनी पथकांचे काम उत्तमरित्या सुरू आहे, तसेच बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी तसेच कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात कडक कारवाई करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केल्या आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित भरोसा सेलच्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अध्यक्षा रूपाली चाकणकर बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस., अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विनोद वळवी  उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. युनूस पठाण आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्रीमती चाकणकर म्हणाल्या, राज्य महिला आयोगाने अग्रेषित केलेल्या सर्व केसेस जिल्हा पोलीस प्रशासनाने निकाली काढल्या असून भरोसा सेल, समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून संबंधित पोलीसांनी न्याय देण्याचे काम केले आहे, जिल्ह्यात महिला आयोगाची कोणतीही केस न्यायाच्या प्रतिक्षेत नाही, त्याबद्दल कौतुक करताना त्यांनी घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांकडे जाणीवपूर्वक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. त्यांचे वेळीच निराकरण होण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा पोलीस दलाने पुढाकार घ्यावा. ज्या प्रकरणात महिलेला भरपाई देण्याच्या सूचना न्यायालयाने केल्या आहेत परंतु नियमित भरपाई दिली जात नाही अशी प्रकरणे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, जबाबदारी झटकून कायदेशीर पळवाटा काढणारा हा देखील आरोपी आहे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे अशी आयोगाची भूमिका आहे, असेही सांगितले.

ज्या खाजगी सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंग निदानाचे काम होतेय, अशा सोनोग्राफी सेंटर्स वर तात्काळ कारवाई सुरू करण्याचे निर्देश श्रीमती चाकणकर यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत.

जिल्ह्यात शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांमधून कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाविरूद्ध समित्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत की नाही याबाबतची खातरजमा करून त्याबाबतचा अहवाल कामगार उपायुक्तांकडून खातरजमा करून पंधरा दिवसांत जिल्हा प्रशासनाने आयोगासमोर सादर करावा.

श्रीमती चाकणकर म्हणाल्या, आयोगाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर दौरा करून प्रत्येक जिल्ह्यात महिला जनसुनावाणी घेण्यात येत असून या प्रत्येक सुनावणीत जिल्हाधिकारी, पोलीस विभाग, विधि सेवा प्राधिकरण यांच्या उत्तम सहकार्यातून महिलांच्या तक्रारींची अनेक प्रकरणे निकाली काढण्यात यश आले आहे. जनसुनावणीत कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे अधिक आढळून आली, परंतु समुपदेशनाच्या माध्यमातून अनेक कुटुंब एकत्र आली आहेत. समाजात घडणाऱ्या हुंडाबळीच्या घटना हि एक सामाजिक विकृती असून या विकृतीविरूद्ध लढा देण्यासाठी सर्वांनी माणूस म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे. संविधानाने महिलांना दिलेले मूलभूत अधिकार, हक्क दिले आहेत. महिला विषयक कायद्यांची माहिती महिलांना माहित असणे आवश्यक असून महिलांना याचा अभ्यास करून गर्भ लिंग निदान, बालविवाह यासारख्या प्रवृत्तीविरूद्ध पुढे येवून लढा दिला पाहिजे.

महिलांनी कौटुंबिक हिंचाराबाबत तक्रार असल्यास ती कौटुबिंक संरक्षण न्यायालयाकडे द्यावी. भरोसा सेलच्या माध्यमातून आपली कौटुंबिक तक्रार मिटवावी व यातूनही समस्याचे निराकरण न झाल्यास राज्य महिला आयोगाकडे दाद मागता येईल. महिलांना संरक्षण व आत्मविश्वास देण्याची जबाबदारी राज्य महिला आयोगाची असल्याचेही अध्यक्षा श्रीमती चाकणकर यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जिल्ह्यात बालविवाह, मातामृत्यू, हुंडाबळी तसेच महिलांच्या समस्यांबाबत आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती दिली. तर जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी पोलीस विभागामार्फत, महिलांसाठी सोशल मीडीया हाताळणी, डायल 112 बाबत माहिती, महिलांविषयक कायद्याची माहिती, तसेच भरोसा सेलमार्फत महिलांना करण्यात येणारे मार्गदर्शन आदिबाबत माहिती महिला आयोग अध्यक्षा श्रीमती चाकणकर यांना दिली.

महिला समुपदेशन केंद्रांचे उद्घाटन

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते आज शहर पोलीस स्टेशन येथे महिला समुपदेशन व सुसंवाद केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

महिला व बालविकास विभागामार्फत संस्कृती बहुउद्देशीय सेवा मंडळाच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात या समुपदेशन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विनोद वळवी यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी व संस्कृती बहुउद्देशीय सेवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

0000000000