येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक ‘बार्टी’ने ताब्यात घेऊन विकसित करावे – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

मुंबई, दि. 9 : येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारकाचे काम पूर्ण झाले आहे. या स्मारकाचा ताबा ‘बार्टी’ने घेऊन याचा उपयोग सर्वसामान्य लोकांसाठी आणि बौद्ध भिक्खूंसाठी करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

मंत्रालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक, येवला येथील कामासंदर्भातील आढावा बैठक झाली. यावेळी संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

या प्रकल्पाच्या टप्पा २ व यापूर्वी तयार झालेली बांधकामे याची तात्पुरत्या स्वरूपात ‘बार्टी’ ही संस्था देखभाल करत आहे. त्यांनी स्मारक कामाची पाहणी व नियमानुसार तपासणी करून इमारतीचा ताबा घेण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. तसेच ‘बार्टी’ने जिल्हा वार्षिक योजनेतून बांधलेले शॉप (गाळे) ताब्यात घेवून ते व्यावसायिकांना वितरीत करण्याच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करावी. टप्पा २ इमारतीच्या शेजारील रस्त्यालगतची जागा हस्तांतरणाबाबत निर्णय घेवून संरक्षण भिंत व गेट बांधकाम पूर्ण करून घ्यावे. यामध्ये आवश्यक ते सहकार्य संबंधित यंत्रणांनी करावे, असे निर्देश श्री. भुजबळ यांनी यावेळी दिले.

दादरची चैत्यभूमी आणि नागपुरच्या दिक्षाभूमी प्रमाणेच येवल्याच्या मुक्तीभुमीला ऐतिहासिक महत्व आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दि.१३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाला मुक्तिभूमी म्हणून संबोधण्यात येते.

मुक्तीभूमीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेवून,या भूमीचा सर्वांगीण विकास केला आहे. फेज १ अंतर्गत याठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांची भव्य मूर्ती,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, विश्वभूषण स्तूप व विपश्यना हॉल उभारण्यात आले. (₹१५कोटी)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या स्थळाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने  ‘ब’ वर्ग तीर्थ स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे.

दुसऱ्या टप्प्यामध्ये साकारलेल्या 15 कोटी रुपयांच्या कामांचे उद्घाटन 3 मार्च 2024 रोजी करण्यात आले.

दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रशिक्षण केंद्र आणि प्रशासकीय इमारत साकारण्यात आली आहे. यामध्ये पाली व संस्कृत अभ्यास केंद्र, सुसज्ज ग्रंथालय, ऑडीओ-व्हिज्युअल रूम, आर्ट गॅलरी, अॅम्फीथिएटर, मिटिंग हॉल,  भिख्कू पाठशाला, १२ भिख्कू विपश्यना गृह, कर्मचारी निवासस्थान, डायनिंग हॉल, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते व लॅण्डस्केपिंग, याचा समावेश असल्याची माहिती श्री. भुजबळ यांनी दिली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचावे आणि त्यामाध्यमातून समाजप्रबोधन व्हावे हा यामागचा हेतू आहे त्यामुळे सर्व यंत्रणांनी समन्वय साधून विहित वेळेत सर्व कामे पार पाडावीत असे आदेश देखील श्री. भुजबळ यांनी दिले.

0000

वंदना थोरात/विसंअ/