मुंबई, दि. ९ : देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून ॲड. राहुल नार्वेकर यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक लोकसभेच्या अध्यक्षांनीही ‘भारतामधील सर्वोत्तम स्पीकर्सपैकी एक’ असे केले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
कफ परेड फेडरेशनच्या वतीने कुलाबा विधानसभा मतदारसंघासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या विशेष सत्कार समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण, महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव आश्विनी भिडे, मुंबई महानगर विकास प्राधिकरणचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आदि मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ॲड. राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विधानसभा ही देशातील सर्वाधिक दिवस चालणारी, सर्वाधिक चर्चासत्र घेणारी व कार्यक्षम विधानसभा असल्याचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत चालणाऱ्या कामकाजामुळे सदस्यांना सातत्याने गती आणि गुणवत्ता राखावी लागते आणि त्यामुळे सामान्य माणसांचे प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडले जातात.
ॲड. राहुल नार्वेकर यांचा मतदारसंघ कुलाबा-कफ परेड परिसर हा राज्याच्या राजधानी क्षेत्रात येतो. हा परिसर ‘स्टेट कॅपिटल रिजन’ म्हणून मान्यता मिळावी, यासाठी नार्वेकर यांनी सातत्याने प्रयत्न केले. या भागातील फ्लोटिंग पॉप्युलेशनसाठी उत्कृष्ट पायाभूत सुविधा उभारण्याचे काम त्यांनी पुढाकाराने सुरू केले आहे.
विधानभवनाचा चेहरा बदलण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचेही कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विधानभवन आज वैशिष्ट्यपूर्ण आहे. डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून कामकाज कागदविरहित करण्याचा निर्णय त्यांच्यामुळेच झाला आहे. तसेच, महाराष्ट्र हे आता देशातील नवे स्टार्टअप हब बनले असून, केंद्र सरकारच्या स्टार्टअप इंडिया 2025 अहवालानुसार, गुंतवणूक व स्टार्टअप संख्येनुसार महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. आज मुंबई-एमएमआर रिजन हा देशातील नवा डेटा सेंटर हब झाला आहे.
अटल सेतू, मरीन ड्राइव्हपर्यंतचा ऑरेंज गेट टनेल, कोस्टल रोड व सी-लिंकचे प्रकल्प यामुळे शहरातील ट्रॅफिकची समस्या सुटेल. बस, मेट्रो, मोनो रेल आदी सार्वजनिक वाहतुकीसाठी सिंगल तिकीट प्रणालीचे काम सुरु असून एमएमआर क्षेत्रातील नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतुकीने एकाच तिकीटावर प्रवास करणे शक्य होणार आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, “धारावी ही केवळ झोपडपट्टी नसून ती एक आर्थिक इंजिन आहे. तिच्या रूपांतरणामध्ये तिथल्या आर्थिक संधींना बळ देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईला स्लम फ्री व लिव्हेबल सिटी बनवण्याचे लक्ष्य पुढील दहा वर्षांत पूर्ण करता येईल,” असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. त्यांनी वाढवण बंदराचा उल्लेख करत सांगितले की, “हे देशातील सर्वात मोठे आणि जगातील टॉप-१० पोर्टपैकी एक असेल.
कुलाबा परिसराला ‘स्टेट कॅपिटल रिजन’ म्हणून दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
कुलाबा मतदारसंघातील हे संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करणारे ठिकाण आहे. मुंबई शेअर बाजार, उच्च न्यायालय, मंत्रालय, विधानभवन, कॉटन एक्स्चेंज, बुलियन मार्केट, मेटल मार्केट, मुंबई विद्यापीठ, मरीन ड्राइव्ह अशा अनेक ऐतिहासिक व महत्त्वाच्या वास्तू येथे आहेत. कुलाबा भागात वास्तव्य करणारी लोकसंख्या सुमारे १३ लाख असून, दररोज सुमारे ४८ लाख लोक चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून या भागात ये-जा करतात. या परिसराला ‘स्टेट कॅपिटल रिजन’ म्हणून दर्जा मिळाण्यासाठी प्रयत्न केले जात आहे, असे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले, “कुलाबा भागात मरीन ड्राइव्हपर्यंत पोहोचणारा कोस्टल रोड, मेट्रो-३ मार्ग, आणि कोस्टल प्रकल्प हे सर्व विकासाच्या दिशेने मोठे पाऊल आहेत. कफ परेड ते मरीन ड्राइव्ह जोडणारा नेल्सन पॉईंट कनेक्टर लवकरच पूर्ण होईल. यामुळे विमानतळापर्यंतचा प्रवास २० ते ३० मिनिटांत शक्य होणार आहे. कफ परेड, मरीन ड्राइव्ह परिसरात कंत्राटी भाडे (लीज) संबंधित समस्यांवरही राज्य शासनाकडून लक्ष देण्यात येत आहे. बांधकाम शुल्क २५ टक्क्यांवरून ५–१० टक्क्यांपर्यंत आणण्यात आले असून, हे २ टक्क्यांपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. कुलाबा मतदारसंघातील नागरिक हे माझे कुटुंब आहे. मी काल, आज आणि उद्याही तुमच्यासोबतच राहणार आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला आहे. २०२७ पर्यंत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. भारताचे सरासरी वय २७ असून, ही युवा लोकसंख्या कुशल बनवली, तर जगातील कोणतीही अर्थव्यवस्था भारताशिवाय चालू शकणार नाही, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचा सत्कार करण्यात आला.
0000
गजानन पाटील/ससं/